नगर – डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील निवासस्थान असलेल्या राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. मार्केटयार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे जावून या घटनेचा निषेध नोंदविला.
यावेळी जिल्हा महासचिव सुनील शिंदे, भारिपचे युवक जिल्हाध्यक्ष सागर भिंगारदिवे, विनोद गायकवाड, दिलीप साळवे, सिद्धार्थ घोडके, आकाश जाधव, अक्षय भिंगारदिवे, गौरव पंडित उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहाप्रती असंख्य बहुजनांची अस्मिता आहे. याठिकाणी दोन अज्ञात व्यक्तिंनी हल्ला करून राजगृहावरील काही वस्तूंची तोडफोड केली. या प्रकार अतिशय निंदनीय असून, ही घटना गंभीर असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
राजगृहावर कायमस्वरूपी 24 तास पोलीस तुकडीचा बंदोबस्त द्यावा, आंबेडकर कुटुंबीयांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.