रुग्णवाहिका चालकावर गुन्हा : आरटीओकडून दर निश्चित
पुणे – रुग्णाला एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रुग्णवाहिकेसाठी तब्बल 8 हजार रुपयांचे भाडे आकारले. याप्रकरणी संबंधित रुग्णवाहिकेविरुद्ध प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून फिर्याद दाखल केली आहे. याबाबत बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला.
बिबवेवाडी येथून सात किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी “संजीवनी ऍम्ब्युलन्स सर्व्हीसेस’कडून 8 हजार रुपयांचे भाडे आकारले होते. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रादेशिक परिवहन विभागाला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्याकडून संबंधितावर कारवाई केली आहे.
मयुर पुस्तके (रा. हडपसर) यांच्या नावावर टेम्पो ट्रॅव्हलर या वाहनाची नोंदणी आरटीओकडे आहे. संबंधित वाहन मोबाइल क्लिनिक या संवर्गात नोंदणी झाले असून, त्यानुसार न वापरता ऍम्ब्युलन्स असे नाव प्रदर्शित केले आहे. या वाहनास रुग्णांकडून वाहतूक भाडे घेण्याची परवानगी नाही. त्यामुळे सदर वाहन मोबाइल क्लिनिक असे प्रदर्शित न करता “ऍम्ब्युलन्स’ असे प्रदर्शित करून रुग्णवाहिका असल्याचे भासवले असल्याचे आरटीओ प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. बुधवारी मोटार वाहन निरीक्षक धनंजय गोसावी यांनी वाहन मोटार कायद्यातील तरतुदीनुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे जप्त केले.
अशी दाखल करता येणार तक्रार
रुग्णवाहिका चालकाकडून प्रशासनाने नेमून दिलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारल्यास याची तक्रार दाखल करता येणार आहे. आरटीओच्या rto.12-mh@gov.in या ई-मेलवर किंवा कार्यालयीन वेळामध्ये आरटीओमध्ये नागरिक तक्रार करू शकणार आहेत.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रुग्णवाहिकांचे दर निश्चित केले असून, त्याप्रमाणे भाडे आकारणे बंधनकारक आहे. नागरिकांनी पुणे किंवा पिंपरी-चिंचवड कार्यालयामध्ये तक्रार दाखल केल्यास, प्रशासनाकडून तातडीने दखल घेण्यात येणार आहे. येत्या काळात रुग्णवाहिका चालक जादा दराने भाडे आकारत असल्याचे निदर्शनास आल्यास, संबंधितावर कारवाई होणार आहे.
– अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे