करोनानंतर शिक्षणप्रक्रिया व्यवस्थित करण्याचे आव्हान
सुस्पष्ट आराखडा तयार करा : विद्यापीठाच्या सूचना
पुणे – यंदा प्रथम वर्षाचे अध्यापन दि. 1 सप्टेंबर, तर इतर सर्व वर्षांचे अध्यापन दि.1 ऑगस्टपासून ऑनलाइन अथवा ऑफलाइन सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्यापूर्वी शिक्षकांनी पूर्वतयारी करावी. करोनानंतर सुरू होणाऱ्या शिक्षणाची प्रक्रिया सुव्यवस्थित होण्यासाठी महाविद्यालय अथवा संस्थांनी सुस्पष्ट आराखडा तयार करावा, अशा सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिल्या आहेत.
शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी शिक्षकांनी ई-कंटेट, नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणीसाठी पूर्वतयारी जूनअखेरीस आणि जुलैमध्ये करणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक तंत्रज्ञान, विद्यार्थ्यांकडे उपलब्ध साधनांचा अभ्यास करून, प्रत्येक विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेत कशा प्रकारे सहभागी होऊ इच्छितो यासाठी महाविद्यालयांना पूर्वतयारी करणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांसाठी गुगल, क्लास रूम अथवा ई-लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिमचा वापर करून शिक्षण प्रक्रिया सुरू करण्यासाठी पूर्वतयारी करावी लागेल. त्यासाठी आराखडा तयार करून त्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, असे विद्यापीठाने म्हटले आहे.
“त्या’ शिक्षक, कर्मचाऱ्यांना सवलत
जी महाविद्यालये किंवा जे शिक्षक, कर्मचारी प्रतिबंधित क्षेत्रात वास्तव्यास आहेत, त्यांना “वर्क फार्म होम’ची सुविधा द्यावी. त्यांनी आवश्यकतेनुसार काम करावे. अशा कर्मचाऱ्यांची सत्राच्या प्रथम दिवशी हजेरीपत्रकावर स्वाक्षरी करणे सक्तीचे करू नये, अशा स्पष्ट सूचना विद्यापीठाने सर्व महाविद्यालय व संस्थांना दिल्या आहेत.