नगर -शहरातील खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा पालकांना दमदाटी करून ऑनलाइन अभ्यासक्रमाच्या नावाखाली अवाढव्य फी वसूल करत आहेत. त्यामुळे पालकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत आहे. त्यामुळे संबंधित शाळांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात येत असून याबाबत युवा सेनेचे जिल्हा अध्यक्ष विक्रम राठोड यांच्या नेतृत्वाखाली माध्यमिक शिक्षणाधिकारी रामदास हराळ यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी नगरसेवक योगीराज गाडे, प्राध्यापक अंबादास शिंदे, महेश शेळके, अभिषेक भोसले, महेश राऊत, अक्षय नागपुरे, नरेश भालेराव, जंगम नाथ, चांदकोटी आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले की, खासगी शाळेकडून इंग्लिश मीडियम स्कूल कडून पालकांना दमदाटी करून, ऑनलाइन च्या अभ्यासक्रमाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात फी ची मागणी संस्थेच्या चालकांकडून करण्यात येत आहे. करोना महामारी मुळे भरपूर कुटुंबांची वाताहत झालेली आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यातच फी भरण्यासाठी पालकांवर दबाव टाकला जात आहे.
शाळेने विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी घेतलेले वाहतूक बस व व्हॅन चे पैसे वाहतूक यावर्षी बंद असून, ते पैसे परत केलेले नाहीत. ते पैसे परत करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा आंदोलन करण्याचा येइल असा इशारा यावेळी देण्यात आला.