सातारा – जिल्हा शासकीय रुग्णालयात करोनामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याने नातेवाइकांनी डॉक्टरांवर बेजबाबदारपणाचा आरोप करत गोंधळ घातला. यामुळे रुग्णालय परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, करोनाच्या संसर्गामुळे महिलेच्या प्रकृतीच्या तक्रारी निर्माण झाल्या होत्या. त्यातून तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालय परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मोळाचा ओढा परिसरातील 21 वर्षीय गर्भवती महिला 31 ऑक्टोबर रोजी क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. त्यावेळी महिलेला थंडी व तापाची लक्षणे होती. महिला गर्भवती आणि पोटात जुळे असल्याने तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. यादरम्यान महिलेची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली.
त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या महिलेवर विशेष पद्धतीने उपचार सुरू होते. दरम्यान, गुरुवारी सायंकाळपासून महिलेला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. रात्री आठच्या सुमारास त्या महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, आज शुक्रवारी सकाळी मृत महिलेच्या नातेवाइकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे गोंधळाचे वातावरण तयार झाले.
त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या दालनाबाहेर गोंधळ घालत संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी समोर येऊन नातेवाइकांशी चर्चा केली. करोनामुळे रक्ताच्या गुठळ्या होऊन संबंधित महिलेच्या तब्येतीची गुंतागुंत वाढल्याने ऑक्सिजन लेव्हल कमी होऊन संबंधित महिलेचा मृत्यू झाल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.