लोणावळा, दि. 4 (वार्ताहर) – लोणावळा विभागात कोठेही अवैध धंदे तसेच बेकायदेशीर कृत्य होऊ देणार नाही असे लोणावळा उपविभागाचे नवनियुक्त पोलीस उपअधीक्षक सत्य साई कार्तिक यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. याकरिता त्यांनी स्वतःचा मोबाईल क्र. 7993148779 हा प्रसिद्धीला दिला असून, आपल्या आजुबाजूला कोठेही अवैध धंदे अथवा बेकायदेशीर घटना घडत असल्यास थेट संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
कार्तिक यांनी पत्रकारांकडून लोणावळा विभागातील लोणावळा शहर, लोणावळा ग्रामीण, कामशेत भागातील समस्यांची माहिती घेतली. तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या पोलीस यंत्रणेकडून काय अपेक्षा आहेत. त्या समजावून घेतल्या. कार्तिक म्हणाले अवैध धंदे हद्दपार करत समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेत निरोगी समाज व पोलिसिंग राबविण्याचा माझा मानस आहे. लोणावळा शहरातील तसेच कामशेत बाजारपेठ, कार्ला – मळवली भागातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी वाहतूक शाखा तसेच टूरिजम पोलिसिंग राबविण्याचा मानस व्यक्त केला.
दरम्यान शहरातील नागरिक, ग्रामपंचायती, नगरपरिषद, पोलीस मित्र, एनएसएस विद्यार्थी यांनासोबत घेऊन गुन्हेगारी व अन्य समस्या सोडविण्यासाठी काम करणार आहे. जे चालले आहे, तसेच चालु ठेवणाऱ्यापैकी मी नाही, यात निश्चित बदल दिसेल मात्र नागरिकांनी देखील याकरिता साथ द्यावी. नागरिकांनी आमचे सीसीटिव्ही कॅमेरे बनून काम करावे, भुशी धरण, लायन्स पॉईट भागातील अवैध धंदे, अंमली पदार्थ वापर यावर कडक कारवाई करणार तसेच खाजगी बंगल्यांमध्ये रात्री उशिरापर्यत वाजणारे म्युझिक सिस्टीम व बेकायदेशीर प्रकार यावर देखील कारवाई करणार असल्याचे सांगितले.
10 दिवसांपूर्वी कार्तिक यांनी लोणावळा विभागाचा पदभार स्विकारला आहे. विभागातील चारही पोलीस ठाणे व भौगोलिक परिस्थिती यांची माहिती घेतल्यानंतर आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत काही माहिती घेतली व विभागात करणार असलेल्या पोलिसिंगची माहिती दिली.
पोलीस कर्मचारी वाढवून मिळविण्यासाठी प्रयत्न करणार
राष्ट्रीय महामार्ग व पर्यटनस्थळांवर पर्यटकांचे व नागरिकांचे होणारे अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. कार्तिक म्हणाले, विभागातील सर्व पोलीस ठाण्यात कर्मचारी संख्या कमी आहे. ती वाढवून मिळावी, याकरिता मी प्रयत्नशील असून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी देखील केली आहे.