आमदार संजय जगताप : जेजुरी नगरपरिषदेत आढावा बैठक
जेजुरी – जेजुरी शहराच्या विकासासाठी नाट्यगृह, उद्यान, ऐतिहासिक पेशवे व होळकर तलावाचे सुशोभिकरण आदी कामे लवकरच मार्गी लागणार आहेत. नाझरे धरणातून पूर्ण क्षमतेने पाणी उचलण्यासाठी नवीन मोटार बसविण्यात येत आहे. लवकरच जेजुरी शहराला दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. जेजुरी शहराला असून वीर धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन योजनेचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आराखडा डिसेंबर महिन्यात शासनाकडे सादर होऊन एक वर्षांत पूर्ण क्षमतेने जेजुरी शहराला वीर धरणातून पाणी पुरवठा होणार असल्याचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.
जेजुरी नगरपालिका सभागृहात आमदार जगताप यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले, माजी नगरध्यक्षा वीणा सोनवणे, नगरसेवक सचिन सोनवणे, महेश दरेकर, अजिंक्य देशमुख रुक्मिणी जगताप, माजी नगराध्यक्ष रोहिदास कुंभार, सुशील राऊत, बाळसाहेब जगताप, पालिकेच्या अधिकारी नेहा गाजरे, संगीता येलमेवाड, प्रमिला सरवदे, बाळसाहेब खोमणे, राजेंद्र गाढवे, कन्हेया लाखे उपस्थित होते.
जगताप म्हणाले की, 2017 मध्ये 2 कोटी 65 लाख रुपये वीज बिलाची थकबाकी होती. तत्कालीन सरकारकडे दंड, व्याज कमी करण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला. उर्वरित वीजबिल भरण्यात आले. मात्र, पुन्हा दंड व व्याज माफ न होता ते थकबाकीत आले. तो प्रश्न सोडविला जाईल. जेजुरी शहर तीर्थक्षेत्राचे ठिकाण असल्याने आरोग्य व स्वच्छता यंत्रणेवर भार पडतो असे असताना तीन वर्षांपासून यात्रा अनुदान उपलब्ध झाले नाही. जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून हा प्रश्न सोडविण्यात येणार आहे. महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील साडेचार कोटी रुपयांची ऐतिहासिक होळकर व पेशवे तलावाचे सुशोभिकरण, रेलिंग आदी विकासकामे लवकरच सुरु होतील.
जेजुरी शहरातील नागरिकांनी मालमत्ता कर वेळीच भरणे आवश्यक आहे. मालमत्ता कराबाबतीत काही त्रुटी असतील तर नागरिकांनी पन्नास टक्के कर भरून त्रुटीबाबत अर्ज करावा, त्या त्रुटी दूर करून उर्वरित कर भरण्यासाठी टप्पे करून द्यावेत, अशा सूचना पालिका प्रशासनाला जगताप यांनी केल्या.
मालमत्ता करांची 6 कोटींवर थकबाकी
मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले म्हणाले की, पालिकेच्या उत्पन्नात मालमत्ता कर ही मोठी बाजू असून 8 कोटी 37 लाख रुपयांची मालमत्ता कर मागणी असून आत्तापर्यंत 1 कोटी 61 लाख रुपये वसूल झाले आहेत तर 6 कोटी 76 लाख रुपये थकबाकी आहे. जेजुरी शहरातील पाणीटंचाई, याबाबत केलेले नियोजन, वीर धरणावरील नवीन पाणी योजना, विकासकामे, वाहनकर ठेका,आठवडा बाजार ठेका, नवीन ओट्यांचे लिलाव, स्वच्छता, आरोग्य यावर उपाययोजना तसेच स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान आदी विषयावर त्यांनी माहिती दिली.