ठाणे – राज्यात महिला अत्याचाराच्या रोजच नवनविन घटना समोर येत आहे. अत्याचार करणाऱ्यांवर कायद्याचा धाक राहिला की नाही असा प्रश्न महिलांच्या वाढत्या अत्याचावरून दिसून येत आहे. अशीच एक धक्कादायक घटना ठाण्यातून समोर आली आहे. नवऱ्याने गर्भवती पत्नीला जिवंत पेटवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून तिला तात्काळ मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर आहे. पीडितेच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाला आहे.
अनिल चौरासिया वय 35 असे आरोपी पतीचे नाव असून तो कळवा परिसरात वास्तव्यास आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यास अटक केली आहे.
या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती अशी की, आरोपी पती व पत्नी यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरु होता. यामुळे या दोघांचे नेहमी भांडण होत होते. दरम्यान पीडितेला आरोपी पतीने अन्य एका तरुणी बरोबर विवाह केल्याचा संशय होता. वारंवार होत असलेल्या वादातून 30 ऑक्टोबर रोजी दोघांमधली वाद टोकाला गेला व संतापलेल्या आरोपी पतीने रॉकेल टाकून ६ महिन्यांच्या गर्भवती पत्नीला पेटवून दिले आहे.