कोल्हापूर : वाहन परत देण्यासाठी 3 हजाराची लाच घेताना करवीर पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक दादाहरी अभिमन्यू बांगर (रा. पोलिस मुख्यालय कसबा बावडा) आणि होमगार्ड प्रविण लहू पाटील (वय २५, रा. भेंडे गल्ली, कुरुकली ता. करवीर) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या कारवाईची माहिती दिली. या कारवाईतील तक्रारदाराने ‘आपले सरकार’ या पोर्टलवर तक्रार दिली होती. या तक्रार अर्जाची चौकशी पोलिस नाईक बांगर यांच्याकडे होती. तक्रारदाराचे वाहन परत मिळवून देण्यासाठी पोलिस नाईक बांगर आणि होमगार्ड पाटील यांनी शनिवारी २५ जुलै रोजी तीन हजार रुपयांची लाच मागितली होती.
ही लाच होमगार्ड पाटील याने रविवारी दुपारी तक्रारदारांकडून स्वीकारली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना ताब्यात घेऊन अटक केली. पोलिस उप अधीक्षक अदिनाश बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक युवराज सरनोबत, हेड कॉन्स्टेबल मोहन खोत, पोलिस नाईक नवनाथ कदम कॉन्टेबल मयूर देसाई हे कारवाईत सहभागी होते.