नवी दिल्ली – विरोधी पक्षांनी आगामी लोकशभा निवडणुकीसाठी आपल्या नव्या आघाडीचे नाव “इंडिया’ असे ठेवल्याबद्दल 26 राजकीय पक्षांविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. नावामध्ये “इंडिया’ या नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर आणि या नावाच्या आधारे विनाकारण प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. या राजकीय पक्षांविरोधात आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, असे डॉ.अविनिश मिश्रा यांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.
विरोधकांच्या आघाडीचे पूर्ण नाव इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुजिव्ह अलायन्स’ असे असले, तरी या नावाचे लघुरुप “इंडिया’असे आहे. त्यामुळे ही आघाडी “इंडिया’ याच लघुनामाने ओळखली जाणार आहे. राजकीय कारणासाठी आघाडीचे नाव “इंडिया’ असे ठेवल्यामुळे सर्व भारतीयांच्या भावना दुखावल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे.
डॉ. मिश्रा यांनी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, ऑल इंडिया तृणमूल कॉंग्रेस, द्रविड मुन्नेत्र कळघम, आम आदमी पार्टी, जनता दल (युनायटेड), राष्ट्रीय जनता दल, झारखंड मुक्ती मोर्चा, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार-गट), जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी), भारतीय कम्युनिस्ट पार्टी, क्रांतिकारी समाजवादी पक्ष, शिवसेना (उद्धव ठकरे गट), समाजवादी पार्टी, राष्ट्रीय लोक दल, अपना दल (कामेरवाडी), ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, मारुमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम, विदुथलाई चिरुथैगल काची, कोंगुनाडू मक्कल देसाई काची, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी-लेनिनवादी), मनिथनेय मक्कल काची, इंडियन युनियन मुस्लिम लीग आणि केरळ कॉंग्रेस (एम), केरळ कॉंग्रेस (जोसेफ) यांच्या विरोधात ही तक्रार दाखल केली आहे.