मुंबई – राज्यभरातील सर्व परिवहन कार्यालयांतील “वायुवेग’ पथकांमार्फत 14 हजार 161 खासगी बसेसची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 4 हजार 277 खासगी बसेस नियम मोडत असल्याचे निदर्शनास आल्याने या बसेसना तपासणी प्रतिवेदने जारी करुन प्रकरणे नोंदवित कारवाई करण्यात आली आहे. विविध कार्यालयांमार्फत 1 कोटी 83 लक्ष तडजोड शुल्काचा दंड वसूल करण्यात आला आहे.
तपासणी दरम्यान रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाईट, वायपर इत्यादी गुन्ह्यांसाठी सर्वात जास्त 1702 बसेस वर कारवाई करण्यात आली. विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करुन वाहन चालविणाऱ्या 890 बसेसवर; योग्यता प्रमाणपत्र वैध नसलेली 570 खासगी बसेसवर, तर 514 बसेसमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचे आढळून आले असून त्यावर कारवाई करण्यात आली.
शासनाने विहित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खासगी कंत्राटी प्रवासी बसेसची व इतर गुन्ह्यांबाबत तपासणी करण्यासाठी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी 16 मे ते 30 जून 2023 दरम्यान विशेष मोहीम राबविली.
सदर तपासणी माहिमेमध्ये बसेसची तपासणी करताना विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करुन वाहन चालविणे, टप्पा वाहतूक, प्रवासी बसमधून अवैधरित्या मालवाहतूक, योग्यता प्रमाणपत्र वैध नसणे, रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाईट, वायपर इत्यादींमध्ये बेकायदेशीर केलेले फेरबदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक,
मोटार वाहन कर भरल्याची खात्री करणे, जादा भाडे आकरणे, अग्निशमन यंत्रणा कार्यरत असणे, आपत्कालीन परिस्थितीत निर्गमन दर आणि इतर दरवाजे कार्यरत स्थितीत आहेत काय आदी बाबींची राज्यभर व्यापक तपासणी करण्यात आली. त्यानंतर उक्त नमूद विविध गुन्ह्यांमध्ये दोषी आढळलेल्या बसेसवर कारवाई करण्यात आली.
गुन्हा बसेसवर कारवाई !
मोटार वाहन कर न भरणे – 485
आपत्कालीन दरवाजा कार्यरत नसणे – 293
अवैधरित्या माल वाहतूक करणे – 227
आसन क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतुक – 147 बसेस
वेग नियंत्रक न बसविणे व कार्यरत नसणे – 72
जादा भाडे आकारणी – 40