मुंबई- चेंबूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संपत गावडे (58) यांनी पोलीस ठाण्यातील भंडारगृहात गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्यातील हवालदार ड्युटीवर आल्यानंतर उघडकीस आला.
गावडे हे कर्करोगाच्या आजाराने अनेक दिवसांपासून त्रस्त होते. फेब्रुवारी 2019 मध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. घटनास्थळी चिठ्ठी सापडली असून यामध्ये आजाराला कंटाळून जीवन संपवित असून यासाठी कुणालाही जबाबदार धरू नये, असे त्यांनी नमूद केले आहे. चेंबूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आजारी असलेल्या गावडे यांना भंडारगृहाची ड्युटी देण्यात आली होती. तिथेच त्यांनी गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना घडली तेव्हा बहुतेक सर्व पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी बाहेर गेलेले होते. गावडे यांना तत्काळ राजवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत्यू जाहीर केले.
दरम्यान, गावडे हे येत्या मे महिन्यात निवृत्त होणार होते. गावडे यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.