पुणे, दि. 3 -बाजीराव आणि शिवाजी रस्त्यावरून बंद केलेल्या दहापैकी महत्वाच्या चार मार्गांवरील बसच्या फेऱ्या पुन्हा पूर्वीच्या मार्गावरून सुरू करण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) बुधवारी घेतला. उद्या (गुरुवार) पासून पुण्यदशमच्या 24, आणि चार मार्गावरील 30 बस पुन्हा बाजीराव रस्ता मार्गे सुरू होणार आहेत. यामुळे या मार्गावर बसच्या एकूण 994 फेऱ्या होणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
शिवाजी व बाजीराव रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पीएमपीने मोठ्या दहा बसचे मार्ग बदण्याचा निर्णय 28 जुलै रोजी घेतला होता. बाजीराव रस्त्यावरून धावणाऱ्या बस शिवाजीनगरकडे जाताना दांडेकर पूल, शास्त्री रस्ता, गोपाळ कृष्ण गोखले (फग्युर्सन रस्ता) मार्गे सुरू केल्या होत्या. तर, परत स्वारगेटकडे येताना जंगली महाराज रस्ता, डेक्कन, टिळक रस्ता या मार्गे स्वारगेटकडे येत होत्या. या निर्णयामुळे बाजीराव रस्ता परिसरात जाणाऱ्या नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
या मार्गावर पुण्यदशमच्या बस वाढविल्या तरी प्रवाशांना थांब्यावर अर्धा-आर्धा तास बसची वाट पाहत थांबावे लागत होते. पुण्यदशम बस लहान असल्यामुळे त्यामध्ये गर्दी होऊन प्रवाशांचे हाल होत होते. तसेच, मार्ग बदलेल्या बसचे आंतर वाढल्यामुळे प्रवाशांना पाच रुपये अतिरिक्त तिकिट द्यावे लागत होते. या निर्णयामुळे पीएमपीवर चौफेर टीका होत होती. त्यामुळे प्रशासनाने महत्वाच्या चार मार्गांवरील सेवा पुन्हा सुरू केली. पीएमपीने प्रवाशांच्या सोयीसाठी 4 मार्ग सुरू केले आहेत. मात्र, सर्वाधिक प्रवाशांची गर्दी असलेले दोन मार्ग अद्याप बंदच आहेत. कात्रज ते शिवाजीनगर आणि अप्पर ते शिवाजीनगर या दोन मार्गांवरील गाड्या बंद आहेत. त्यामुळे कात्रजवरून आणि अप्परवरून येणाऱ्या नागरिकांना अजूनही स्वारगेट येथे गाडी बदलावी लागत आहे व अतिरिक्त पैसे द्यावे लागत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ या मार्गावरील गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
बाजीराव आणि शिवाजी रस्त्यावरील बस सेवा पुन्हा सुरू
मी दोन दिवस स्वारगेट ते शिवाजी नगर या मार्गावरील पुण्यदशम बसने प्रवास करून या मार्गाची पाहणी केली. त्यावेळी विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत असल्याचे आढळून आले. मार्गावरील सध्यस्थितीचा अहवाल तयार करून मी व्यवस्थापकीय संचालकांना दिला होता. त्यानुसार पुन्हा महत्वाच्या चार मार्गांवरील बस बाजीराव रस्त्याने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
– सुबोध मेडसीकर,
सरव्यवस्थापक, पीएमपी