मुंबई – एमआयएम पक्षाचे खासदार इम्प्तियाज जलिल यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा एक जुना व्हिडिओ शेअर करून त्यांची खिल्ली उडवली आहे. बोफोर्स तोफ सुद्धा जितका लांब गोळा फेकू शकत नसेल त्याहीपेक्षा ही फेकाफेकी अजब आहे, असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
पंतप्रधानांनी पूर्वी सन 2022 मध्ये देशातील एकही माणूस घराशिवाय असणार नाही असे विधान करताना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देशातल्या सर्वांना घर देण्याचे स्वप्न आपण पूर्ण करू, असे मोदींनी म्हटले होते. एवढेच नव्हे तर आपले आश्वासन कॉंग्रेससारखे नसते.
आपण ते पूर्ण करून दाखवतो आणि हे घर म्हणजे नुसते घर नसेल तर त्यात नळ, नळाला पाणी, गॅस कनेक्शन, लाईट कनेक्शन, एलईडी बल्ब, शौचालय अशा स्वरूपाची परिपूर्ण घरे आपण सन 2022 पर्यंत देशातील सर्व जनतेला देऊ असे आश्वासन पंतप्रधान मोदी या भाषणात देताना दिसत आहेत.
स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष येत्या 15 ऑगस्टला संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर जलिल यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.