महापालिकेचा सुखद धक्का !

60 टक्‍क्‍यांपर्यंत नालेसफाई पूर्ण ः 15 मे पर्यंतची “डेडलाईन’

पिंपरी –
पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईचे काम हाती घेणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने यंदा शहरवासीयांना सुखद धक्का दिला आहे. नालेसफाईचे काम लवकर हाती घेत 60 टक्‍क्‍यांपर्यंत नालेसफाई पुर्ण देखील झाली आहे. 15 मे पूर्वी शंभर टक्‍के नालेसफाईचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे.

महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत छोटे-मोठे मिळूून 157 नाले आहेत. या नाल्यांची लांबी सुमारे शंभर किलोमीटर आहे. नाले साफसफाई वर्षभर राबविणे गरजेचे असताना पावसाळ्याच्या तोंडावर महापालिकेकडून नाले साफसफाईचा दिखावा केला जातो. छोटे नाले महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत तर मोठे नाले ठेकेदारांमार्फत स्वच्छ करून घेतले जातात मे महिन्याच्या अखेरीस प्रत्यक्ष कामाला सुरुवात होते. त्यामुळे पाऊस सुरू होऊनही नालेसफाई पूर्ण होत नाही. मात्र ठेकेदारांना पूर्ण कामाचे बिल अदा केले जाते. नालेसफाई झाली नसतानाही चांगल्या कामाचा शेरा अधिकारी देतात. या सर्व प्रक्रियेमध्ये करदात्यांचे पैसे पाण्यात जातात. त्यामुळे पावसाळ्यात नाले तुंबून लगतच्या घरांमध्ये पाणी शिरते. नाल्यालगतच्या झोपडपट्टी परिसरात पुरसदृश परिस्थिती निर्माण होते. अनेकांचा संसार नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून जातो.

महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी गेल्या अनेक वर्षाच्या नालेसफाईच्या लेटलतिफ कारभाराला फाटा देत मार्च महिन्यापासूनच नालेसफाईच्या कामावर भर दिला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षापासून सर्व नाले आरोग्य विभागामार्फतच स्वच्छ केले जात आहेत. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी (सीएसआर) उपक्रमांतर्गत त्यासाठी जेसीबी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे नालेसफाईच्या नावाखाली ठेकेदारांवर होणाऱ्या कोट्यवधींच्या उधळपट्टीला लगाम लागला आहे. ठेकेदाराकडून नालेसफाई करून गाळ, कचरा नाल्याच्या काठावरच टाकला जायचा. त्यामुळे पावसाळ्यात नाल्यांची परिस्थिती “जैसे थे’ असायची. महापालिकेचे कर्मचारीच नालेसफाई करीत आहेत. नाल्यातून काढलेला कचरा, राडारोडा याची त्वरित विल्हेवाट लावली जात आहे.

एकूण नाल्यांपैकी सुमारे 90 टक्के नाल्यांच्या सफाईचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. त्यापैकी 15 टक्के नाल्यांची सफाई शंभर टक्के पूर्ण झाली आहे. उर्वरित नाल्यांचे काम 80 टक्‍क्‍यांपर्यंत पूर्ण झाले आहे. एकूण नाल्यांपैकी नालेसफाईची टक्केवारी सुमारे 60 ते 65 टक्के आहे. येत्या 15 मे पूर्वी शंभर टक्के नाले सफाई पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. काही मोठ्या नाल्यांसाठी पोकलेनची आवश्‍यकता आहे. मनुष्यबळाचा वापर करून हे नाले स्वच्छ करणे अशक्‍य आहे. त्यामुळे पोकलेन मिळताच उर्वरित नाल्यांच्या सफाईला वेग येईल, अशी माहिती महापालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार रॉय यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.