Pro Kabaddi 2023-24 : प्रो कबड्डी 2023-24 चा (PKL 10) नोएडा (UP) लेग 29 डिसेंबर ते 3 जानेवारी या कालावधीत झाला आणि त्यात एकूण 11 सामने खेळले गेले. या लेगनंतरही पुणेरी पलटणने पहिले स्थान कायम ठेवले असून 9 सामन्यांत 8 विजयांसह 41 गुण प्राप्त केले आहेत. होम टीम यूपी योद्धास 4 सामन्यात फक्त 1 विजय मिळवता आला आहे आणि पॉइंट टेबलमध्ये 10व्या स्थानावर आहे. तेलुगु टायटन्स आणि शेवटचे स्थान यांच्यातील अतूट नाते या लेगनंतरही कायम आहे.
PKL 10 च्या पाचव्या आठवड्यात, अनेक रेडर्सनी त्यांच्या कामगिरीने प्रभावित केले आणि 4 खेळाडूंनी 22 किंवा अधिक रेड पॉइंट मिळवले. यूपी योद्धाचा कर्णधार परदीप नरवालने होम लेगमध्ये सर्वाधिक रेड पॉइंट घेतले पण त्याचा फारसा फायदा संघाला झाला नाही.
गेल्या आठवड्यात PKL 10 मध्ये सर्वाधिक रेड पॉइंट मिळवणाऱ्या 4 खेळाडूंवर एक नजर टाकूया :
1. परदीप नरवाल (यूपी योद्धाज) – 44 रेड पॉइंट : पीकेएल 10 च्या यूपी लेगमध्ये, यूपी योद्धा संघाचा कर्णधार परदीप नरवालने चांगली कामगिरी केली आणि 4 सामन्यांमध्ये 2 सुपर 10 च्या मदतीने जास्तीत जास्त 44 रेड पॉइंट घेतले. मात्र, परदीपच्या या कामगिरीनंतरही यूपी योद्धास होम लेगमध्ये केवळ एकच विजय मिळाला.
पुणेरी पलटणविरुद्ध 40-31 ने पराभूत झालेल्या सामन्यात 6 रेड पॉइंट घेण्याआधी, परदीपने पाटणा पायरेट्सविरुद्ध चमकदार कामगिरी करत 21 रेड पॉइंट्स घेतले होते पण तो संघाला 48-41 अशा पराभवापासून वाचवू शकला नाही. तसेच दंबग दिल्लीविरूध्द त्याने 7 रेड पाॅइंट मिळवले होते मात्र तिथेही त्याचा पराभव झाला. तर युपी लेग च्या पहिल्या दिवशी परदीपनं 10 रेड पाॅइंट घेत संघाला बेंगळुरूविरुध्द 34-33 असा विजय मिळवून दिला होता.
2. प्रतीक दहिया (गुजरात जायंट्स) – 31 रेड पॉइंट : यूपी लेगमध्ये, गुजरात जायंट्सचा रेडर प्रतीक दहिया याने 2 सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आणि एका सुपर 10 सह 31 रेड पॉइंट घेतले. प्रतीकने दबंग दिल्लीविरुद्ध 9 रेड पॉइंट्स घेतले, पण 35-28 अशा पराभवापासून तो संघाला वाचवू शकला नाही. मात्र, याआधी बंगाल वॉरियर्सविरुद्ध संघाच्या 51-42 अशा विजयात प्रतीकने आपल्या कामगिरीने सर्वांनाच चकित केले होते आणि 22 रेड पॉइंट मिळवून सामन्याची दिशाच बदलली होती.
3. मंजीत (पटना पाइरेट्स) – 22 रेड पॉइंट : पटना पायरेट्सचा रेडर मनजीतने यूपी लेगमध्ये चांगली कामगिरी केली आणि 2 सामन्यात एका सुपर 10 सह 22 रेड पॉइंट घेतले. मनजीतने यूपी योद्धाविरुद्ध संघाच्या 48-41 च्या विजयात 9 रेड पॉइंट घेतले आणि त्याआधी हरियाणा स्टीलर्सविरुद्ध 46-33 च्या विजयात त्याने सर्वाधिक 13 रेड पॉइंट घेतले.
#PKLSeason10 ( #HSvJPP) : जयपुरची आगेकूच कायम; हरियाणा स्टीलर्सवर दमदार विजय…
4. आशु मलिक (दबंग दिल्ली) – 22 रेड पॉइंट : दबंग दिल्लीचा कर्णधार आशु मलिकने देखील यूपी लेगमध्ये चांगली कामगिरी केली आणि 2 सामन्यात 2 सुपर 10 सह 22 रेड पॉइंट घेतले. आशू मलिकने गुजरात जायंट्सविरुद्ध संघाच्या 35-28 अशा विजयात 11 रेड पॉईंट्स घेतले, तर आशूने यूपी योद्धाविरुद्ध 35-25 अशा विजयी सामन्यात पुन्हा 11 रेड पॉइंट घेतले.