IPL 2024 Final : विजेतेपदाची लढत कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या, किती असेल सर्वात स्वस्त तिकीट…

IPL Final 2024 : आयपीएल 2024 सुरुवातीपासून शेवटपर्यंत विक्रमांनी घेरले आहे. एका संघाने इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली आणि दुसऱ्या संघाने सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करण्याचा पराक्रम केला. यंदाच्या हंगामातील लढती अंतिम टप्प्यापर्यंत आल्या आहेत आणि एलिमिनेटर आणि क्वालिफायर सामने देखील येत्या काही दिवसांत निश्चित होतील.
कोलकाताने आपल्या शेवटच्या सामन्यात मुंबईचा पराभव करून प्ले ऑफमध्ये स्थान निश्चित केले आहे तर इतर संघात जोरदार स्पर्धा चालू आहे. पण अशा परिस्थितीत कोणते संघ अंतिम फेरीत पोहोचू शकतील हे जाणून घेण्यात चाहत्यांना उत्सुकता आहे. चेन्नई सुपर किंग्ज हा गतविजेता आहे, परंतु अद्याप प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकलेला नाही. चला तर मग जाणून घेऊया की, क्रिकेटप्रेमी आयपीएल 2024 स्पर्धेची फायनल कधी आणि कुठे पाहू शकतात.
आयपीएल 2024 ची फायनल कधी आणि कुठे होईल?
आयपीएल 2024 चा अंतिम सामना रविवार, 26 मे रोजी चेन्नईतील प्रतिष्ठित एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल, ज्याला चेपॉक स्टेडियम असेही म्हणतात. त्याआधी क्वालिफायर 2 सामना देखील चेपॉक स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना सायंकाळी साडेसात वाजता सुरू होईल.
तिकिटाची किंमत किती असेल?
आयपीएल 2024 च्या तिकिटांची किंमत अद्याप जाहीर झालेली नाही. पण गेल्या सीझनबद्दल बोलायचे झाले तर तिकिटाची किंमत 1,000 ते 40,000 रुपयांपर्यंत होती. अशा परिस्थितीत, आयपीएल 2024 च्या वाढत्या उत्साहामुळे, यावेळी अंतिम सामन्याचे सर्वात महाग तिकीट 40 हजार रुपयांपेक्षाही जास्त होऊ शकते.
अंतिम सामन्यचे तिकीट कसे बुक कराल?
जर तुम्हाला आयपीएल 2024 च्या फायनलसाठी तिकिटे बुक करायची असतील तर तुम्ही पेटीएम इनसाइडर (Paytm Insider) मोबाईल ऍप्लिकेशनवर जाऊन तिकिटे खरेदी करू शकता. तुम्ही ॲपमध्ये प्रवेश करताच, तुम्हाला अंतिम फेरीचे तिकीट खरेदी करण्यासाठी ‘चेन्नई’ शहरावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला फायनल मॅच ऑप्शनवर क्लिक करावे लागेल, त्यानंतर मोबाईलवर ‘बाय नाऊ’ (Buy Now) हा पर्याय दिसेल. त्यानंतर स्टँडची विंडो उघडेल, जिथे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार उपलब्ध जागांपैकी कोणतीही जागा निवडू शकता. तुम्हाला किती तिकिटे घ्यायची आहेत याचाही पर्याय तुमच्याकडे असेल. हे सर्व केल्यानंतर तुम्हाला फक्त पेमेंट करावे लागेल, ज्याद्वारे तुमचे ऑनलाइन तिकीट बुक होईल.





