भुवनेश्वर – अल्टीमेट खो-खोच्या सीझन दोन मध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात ओडिशा जगरनॉट्सने राजस्थान वॉरियर्सवर ११ गुणांनी विजय साजरा केला. या सामन्यात एम के गौतमला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ओडिशा जगरनॉट्सने राजस्थान वॉरियर्सवर ३२-२१ (मध्यंतर १५-९) असा ११ गुणांनी विजय साजरा केला.
Collecting one more win in the bag 😎#UltimateKhoKho #IndiaMaarChalaang pic.twitter.com/pxWLmJsBhj
— Ultimate Kho Kho (@ultimatekhokho) January 3, 2024
ओडिशा जगरनॉट्सने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण घेतले. या सामन्यातील पहिल्या टर्न मध्ये ओडिशा जगरनॉट्सच्या विशालला वृषभ वाघने आकाशीय सूर मारत बाद केले तर गौतम एम के ने ३ ड्रीम रन्सचे गुण मिळवत केलेले संरक्षण निलेश पाटीलने आकाशीय सूर मारत बाद करत थांबवले. त्यानंतर दिलीप खांडवीने ४ ड्रीम रन्सचे गुण मिळवत राजस्थान वॉरियर्सला कडवी लढत दिली व त्यानंतर दिलीप ५.२२ मि. नंतर बाद झाला तर दुसऱ्या तुकडीतील कोणीही बाद न झाल्याने ओडिशा जगरनॉट्स सात ड्रीम रन्स सह ७-६ असा एक गुणाने आघाडीवर राहिला. पहील्यांदाच आक्रमण करताना राजस्थान वॉरियर्स पिछाडीवर पाहायला मिळाला.
दुसऱ्या टर्न मध्ये ओडिशा जगरनॉट्सच्या आक्रमकांनी राजस्थान वॉरियर्सवर १५-९ अशी ६ गुणांची आघाडी घेतली. सुरवातीचा खेळ पाहिल्यावर ओडिशा जगरनॉट्स मोठी आघाडी मिळवतील असे वाटत असताना राजस्थान वॉरियर्सच्यां वृषभ वाघने उधळून लावली. मध्यंतरानंतर तिसऱ्या टर्न मध्ये ओडिशा जगरनॉट्सच्या दिपक साहूला राजस्थानच्या डी. नंदन ने बाद केले तर अक्षय मासाळला विजय हजारेने स्तंभात बाद केले तर मनोज पाटीलला निलेश पाटीलने आकाशीय सूर मारत बाद केले.
ओंकार सोनवणेने ३ ड्रीम रन्स मिळवत राजस्थान वॉरियर्सच्या आक्रमणातील हवाच काढून टाकली. शेवटच्या व चौथ्या टर्न मध्ये ओडिशा जगरनॉट्सला फक्त ४ गुणांचे विजयाचे आव्हन होते. राजस्थानची पहिली तुकडी २.२२ मिनिटात बाद झाली व ओडिशा जगरनॉट्सला ६ गुण मिळाले. हा सामना ओडिशा जगरनॉट्सने ३२-२१ असा ११ गुणांनी जिकला. या सामन्यात निलेश पाटीलला उत्कृष्ट आक्रमक, दिलीप खांडवीला उत्कृष्ट संरक्षक तर एम के गौतमला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.