पिंपरी – संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त रविवारी (दि. 20) पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) 125 जादा बस सोडण्यात आल्या. त्याला वारकरी, भाविक भक्तांचा चांगला प्रतिसाद मिळाला. एसटीची सेवा सध्या संपामुळे बंद आहे. त्यामुळे पीएमपीएमएलने जादा बस सेवा दिल्याने नागरिकांची गैरसोय टळली.
संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त एसटीकडून दरवर्षी जादा बसेस सोडण्यात येतात. मात्र, सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. अद्यापही हा संप मिटलेला नाही. पर्यायाने, वल्लभनगर येथील आगारातून संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी एकही एसटी बस सोडण्यात आली नाही.
दरम्यान, पीएमपीएमएलने मात्र विविध मार्गांवर 125 जादा बस सोडल्या होत्या. विठ्ठलवाडी येथून तळवडे मार्गे निगडीसाठी बस सोडण्यात आली. तसेच, देहू येथून स्वारगेट, मनपा भवन, पुणे स्टेशन येथे देखील बस सोडण्यात आल्या. त्याशिवाय, देहूरोड येथून निगडीसाठी देखील बस सोडण्यात आली.
गतवर्षी तुकाराम महाराज बीज सोहळा हा मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पार पडला होता. यंदा करोनाचे निर्बंध शिथिल केले असल्याने तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक देहूत दाखल झाले होते. त्यांना पीएमपीएमएलकडून करण्यात आलेल्या बस व्यवस्थेमुळे इच्छित स्थळी जाणे सुकर झाले.