पिंपरी, (प्रतिनिधी) – पीएमपीने संत तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त देहूगाव येथे जादा बसेसचे नियोजन केले होते. तीन दिवसांच्या या नियोजनात पीएमपीला १६ लाख ६० हजार ३० रुपये उत्पन्न मिळाले. तर, एकूण १९४ बस ३७ हजार ९७२ किलोमीटर बस धावल्या. त्यातून लाखो भाविकांनी प्रवास करत देवदर्शनाचा लाभ घेतला.
२७ मार्च रोजी “तुकाराम बीज” होती. त्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱयातून भाविक दर्शन आणि बीज सोहळ्यासाठी येतात. त्यांच्या सोयीसाठी विविध ठिकाणांहून बसची सोय करण्यात आली होती. त्यात स्वारगेट, पुणे मनपा भवन, मनपा भवन ते आळंदी, देहूगाव ते आळंदी, स्वारगेट ते आळंदी, पुणे स्टेशन ते देहूगाव, निगडी ते देहूगाव, हडपसर ते आळंदी आदी मार्गांवर जादा बस सोडण्यात आल्या होत्या.
बीज सोहळ्यानिमित्त व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या दर्शनासाठी देहूगाव येथे भाविक मोठ्या प्रमाणात येतात. तेथे त्यानिमित्त यात्रेचे स्वरूप असते. यंदाचा सोहळा हा त्रिशतकोत्तर सोहळा होता. त्यामुळे यंदाच्या सोहळ्याचा महत्त्व होते. त्यानिमित्त देहू आणि पर्यायाने आळंदी येथे जाणाऱया भाविकांची मोठी संख्या होती.
परिणामी तुकाराम बीजेनिमित्त पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच उपनगरांतून देहूगाव येथे जाणाऱ्या भाविकांच्या व प्रवाशी नागरिकांच्या सोयीसाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही पुणे परिवहन महामंडळामार्फत जादा बसेसची व्यवस्था नेहमीच्या तिकीट दराने केली होती.
तसेच देहूगाव येथून परतीच्या प्रवासासाठी देहूगाव येथील झेंडे मळ्याजवळ मिलिटरी परिसरातील उजव्या बाजूच्या मोकळ्या जागेत परिवहन महामंडळाचे तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले होते. तसेच देहूगाव ते आळंदी दर्शन जाण्याकरीता देहूगाव-आळंदी रस्त्यावर गाथा परिसरातील जगद्गुरू संत तुकाराम महाराज क्रिडांगणाजवळील गायरानाच्या मोकळ्या जागेतून जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या.
या सोहळ्यासाठी दिंड्या व भाविकांची आठ दिवस आधीच गर्दी होत असते. त्यामुळे पीएमपीने २६ मार्च ते २८ मार्च या तीन दिवसांच्या कालावधीत जादा बसची सोय केली होती. तीन दिवसांच्या या कालावधीत १९४ जादा बस धावल्या. त्यातून पीएमपीला १६ लाख ६० हजार ३० रुपये उत्पन्न मिळाले, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.
बीज सोहळा उत्पन्न
दिनांक जादा बस संख्या उत्पन्न किलोमीटर
२६ मार्च ३१ २६७९०५ ७३०८.७०
२७ मार्च १२५ ११३५९६४ २३९८०.७०
२७ मार्च ३८ २६५१६१ ६६८३.००
एकूण १९४ १६६००३० ३७९७२.४०