पिंपरी : पुन्हा ‘स्वाईन फ्लू’ची बाधा

गेल्या तीन महिन्यांत 14 बाधित, दोघांचा मृत्यू

पिंपरी – वातावरणातील सततच्या बदलामुळे “स्वाईन फ्लू’ने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. शुक्रवार (ता. 19) एक बाधित रुग्ण आढळला असून खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच, गेल्या तीन महिन्यात “स्वाईन फ्लू’ ची 14 जणांना लागण झाली असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात मागील वर्षी “स्वाईन फ्लू’ने थैमान घातले होते. जानेवारी 2018 ते जून महिन्यापर्यत केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. मात्र, पावसाळा सुरु झाल्यानंतर जुलै ते ऑक्‍टोबर महिन्यापर्यत 31 रुग्णांचा मृत्यू झाल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. परंतु, पावसाचा जोर कमी झाल्यानंतर “स्वाईन फ्लू’ने बाधित रुग्णांची संख्या कमी झाली होती. मात्र, यंदाच्या वर्षी जानेवारी 2019 ते एप्रिल महिन्याच्या मध्यान्हापर्यत गेल्या तीन महिन्यात दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून 45 संशयित रुग्ण आढळले आहेत.

“मागील वर्षी टॅमी फ्लू गोळ्या व स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक लसीची कमतरता जाणवत होती. मात्र, सद्यस्थितीत स्वाईन फ्लू या भयावह आजाराचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात मोफत टॅमी फ्लू गोळ्या उपलब्ध आहेत. यामुळे, नागरिकांनी टॅमी फ्लू गोळ्या घेण्याची आवश्‍यकता आहे. “स्वाईन फ्लू’ला आटोक्‍यात आणण्यासाठी महापालिकेनेही उपाययोजना केलेल्या आहेत. नागरिकांनी सर्दी, खोकला झाल्यास रुग्णालयात दाखवावे. शिंकताना व खोकताना तोंडावर हात रूमाल धरावा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच, स्वाइन फ्लूची लक्षणे दिसताच त्वरित उपचारासाठी डॉक्‍टरकडे जाण्याचे आवाहन, महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.