कव्हर स्टोरी – वाढती लोकसंख्या; वैशिष्ट्ये आणि आव्हाने (भाग १)

प्रा. डॉ. जे. एफ. पाटील (ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ)

भारताच्या लोकसंख्येने 136 कोटींचा आकडा ओलांडला असून येणाऱ्या काळात भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश बनणार आहे. लोकसंख्येकडे काही जण भार म्हणून पाहतात, तर काही जण लाभ किंवा संधी म्हणून पाहतात. वाढत्या लोकसंख्येबरोबर वाढत्या साधनसामग्रीच्या वापरामुळे दरडोई वास्तव उत्पन्न वाढत जाते तोपर्यंत आर्थिक निकषावर लोकसंख्येचा प्रश्‍न गंभीर झालाय असे म्हणता येत नाही. तथापि, अनारोग्याचे प्रश्‍न, विषमतेचे प्रश्‍न, गर्दीचे प्रश्‍न, वाहतूक, अपघातांचे प्रश्‍न, संसर्गजन्य रोगांचे प्रश्‍न यासारख्या गोष्टी वाढत जाणे, गुन्हेगारी वाढणे या परिणामांचा विचार करायला हवा. त्यादृष्टीने लोकसंख्येचे नागरी केंद्रीकरण कसे टाळता येईल, लोकसंख्येचे प्रादेशिक वितरण अधिक समान कसे करता येईल हे पाहावे लागेल.

आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मताप्रमाणे म्हणजे संयुक्‍त राष्ट्र परिषदेनुसार 2019 मध्ये भारताची लोकसंख्या अंदाजे 137 कोटी इतकी झाली आहे. म्हणजे जगातील सर्वोच्च लोकसंख्येच्या निकषावर भारत दुसऱ्या क्रमांकाचा देश असून क्षेत्रफळाच्या निकषावर सातव्या क्रमांकाचा देश आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 16.66 टक्‍के लोकसंख्या भारतात आहे. प्रत्येक 4 व्यक्‍तींपैकी एक व्यक्‍ती भारतीय आहे. भारतात 2001-2011 या दहा वर्षांत लोकसंख्येच्या वाढीचा दर 1.77 टक्‍के राहिला होता. सुदैवाने तो सध्या 1.08 टक्‍के आहे. भारतात लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 416 इतकी आहे. यानंतरच्या काळामध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढणार नसली तरीही आताचे लोकसंख्येचे आकारमान येत्या दोन दशकांमध्ये मंदगतीने वाढूनही आपली लोकसंख्या जगातील प्रथम क्रमांकाची होण्याची शक्‍यता आहे.

भारतातील या लोकसंख्येची काही वैशिष्ट्ये आहेत आणि ती समजून घेतली पाहिजेत. यातील पहिले वैशिष्ट्ये लोकसंख्येच्या वयोरचनेचे आहे. आताच्या आकडेवारीनुसार 0 ते 14 या वयोगटात 27 टक्‍के, 10 ते 24 वयोगटात 27 टक्‍के असे 0 ते 24 या वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण 54 टक्‍के इतके प्रचंड आहे. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर पुढील अनेक वर्षांसाठी जगातील सर्वांत मोठी तरुण लोकसंख्या भारतातच असणार आहे. याचा उल्लेख काही वेळा लोकसंख्या रचनेचा लाभ किंवा डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणून केला जातो. विशेष म्हणजे 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांचे प्रमाणही वाढत आहे. आज हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 6 टक्‍के आहे. काही वेळा ज्येष्ठ नागरिकांच्या लोकसंख्येचे वर्णन काही जणांकडून दुसरा डेमोग्राफिक डिव्हिडंट असे करतात; तर काहींच्या मते हा डेमोग्राफिक बर्डनचा प्रकार असतो.

भारतात लोकसंख्येच्या बाबतीत झालेले काही चांगले बदलही लक्षात घ्यायला हवेत. यामध्ये मृत्यूप्रमाण, जन्मप्रमाण यात लक्षणीयरित्या झालेली घट ठळकपणाने समोर येते. विशेषतः प्रसुतीदरम्यान होणाऱ्या महिलांच्या मृत्यूचे प्रमाण 1994 मध्ये 488 होते, ते 2015 मध्ये 174 वर आले आहे. ही नक्‍कीच सकारात्मक सुधारणा आहे. अर्भक मृत्यूदरामध्ये समाधानकारक घट झालेली असूनही महिला आरोग्याच्या बाबतीत आणि एकूणच महिलांच्या सामाजिक दर्जाबाबतीत काही महत्त्वाचे प्रश्‍न दिसून येतात. त्यामध्ये मुलांना जन्म द्यायचा की नाही तसेच लैगिंक संबंध ठेवायचे की नाही याबाबतीत महिलांचे स्वातंत्र्य फारच मर्यादित आहे (जवळजवळ हे स्वातंत्र्य नाहीच). तसेच महिलांचे सामाजिक जीवन, आर्थिक जीवन असुरक्षित आहे. त्यामुळे एकूणच भारतीय लोकसंख्येमध्ये महिलांचे जगणे हे त्या अर्थाने विषमतेचे दिसते. उपरोक्‍त आकडेवारी लक्षात घेतल्यानंतर भारतीय लोकसंख्येच्या बाबतीत काही महत्त्वाचे प्रश्‍न उपस्थित करावे लागतात. नजीकच्या भविष्यात या प्रश्‍नांची तीव्रता वाढत जाणार असल्यामुळे त्याचे पूर्वनियोजन गांभीर्याने करण्याची गरज आहे. हे प्रश्‍न पुढीलप्रमाणे-

भारताची लोकसंख्या जगातील प्रथम क्रमांकाची होणार म्हणजे ही लोकसंख्या तब्बल 160 कोटींच्या घरात जाईल. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पोसण्यासाठी भारतीय शेतीची उत्पादकता आणि वैविध्य यामध्ये नियोजित सुधारणा करणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतीचा पाणीपुरवठा, शेतमालाच्या साठ्याची व्यवस्था, शेतीमाल प्रक्रिया उद्योग, शेतमाल वाटपाची व्यवस्था हे महत्त्वाचे घटक ठरणार आहेत.

तरुण वयाची सर्वात मोठी लोकसंख्या या देशात पुढील अनेक वर्षासाठी असेल. ही लोकसंख्या भारभूत किंवा बर्डन ठरायची नसेल आणि त्याचा देशाच्या विकासाला उपयोग व्हायचा असेल तर या लोकसंख्येला उत्तम शिक्षण आणि उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध झाल्या पाहिजेत. या दोन्ही गोष्टी विषम समाजव्यवस्थेमध्ये मोफत असल्याशिवाय सर्वांना उपलब्ध होऊ शकत नाहीत. म्हणून पूर्वप्राथमिक शिक्षण, प्राथमिक शिक्षण आणि दुय्यम शिक्षण यांच्यात अजूनही संख्यात्मक वाढ करण्याची गरज आहे. उच्च शिक्षणाच्या संख्यात्मक वृद्धीपेक्षा त्यांच्या गुणात्मक विकासासाठी जास्त गुंतवणूक करण्याची गरज आहे. संपूर्ण देशभर शिक्षणाची गुणवत्ता एका दर्जाची ठेवण्यासाठीही प्रयत्न करावे लागतील. जे विश्‍लेषण शिक्षणाला लागू होते तेच आरोग्यसेवेच्या बाबतीतही लागू होते.

वाढती वृद्धांची संख्या ही बहुआयामी प्रश्‍न निर्माण करणारी आहे. वृद्धांचे आरोग्य आणि त्याचे व्यवस्थापन, वृद्धांचे जगणे सुसह्य करणे, वृद्धांच्या कौशल्याचा समाजासाठी वापर करून घेणे अशा गोष्टी अधिक महत्त्वाच्या ठरतात. आजच्या कालखंडामध्ये कुटुंबव्यवस्था हळुहळु ऱ्हास पावत असताना या वृद्धांसाठी वृद्धाश्रमांची संख्या वाढवणे, अशा वृद्धाश्रमांच्या सेवासुविधांची गुणवत्ता वाढवणे ही नजीकच्या भविष्यातील समाजाची महत्त्वाची गरज असणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.