पिंपरी (प्रतिनिधी) – सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात आत्तापर्यंत एकूण 92 रुग्णांच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यापैकी 61 रुग्ण हे करोनापासून मुक्त झाले आहेत. म्हणजे रुग्णालयातून करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे 66.30 टक्के इतके आहे.
जिल्हा रुग्णालयात आत्तापर्यंत एकूण 642 करोना संशयित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यातील 534 रुग्णांच्या चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. म्हणजे एकूण घेतलेल्या चाचण्यांपैकी अहवाल निगेटिव्ह येण्याचे प्रमाण हे तब्बल 83.17 टक्के इतके आहे.
पॉझिटिव्ह अहवाल आलेले रुग्ण हे 92 इतके आहेत. त्यातील 61 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यांना उपचार करून घरी सोडण्यात आलेले आहे. म्हणजे एकूण बाधित रुग्णांपैकी करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 66.30 टक्के आहे. तर, आत्तापर्यंत रुग्णालयात एकूण 9 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. करोना बाधित एकूण रुग्णांपैकी मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 9.78 टक्के इतके आहे. 16 रुग्णांच्या चाचण्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल सहा रुग्णांचा करोना चाचणीचा अहवाल सोमवारी (दि. 25) पॉझिटिव्ह आला. तर, रविवारी (दि. 24) उपचार सुरू असताना येरवडा येथील 71 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये जुन्नर, शिरूर, आंबेगाव आणि बारामती या तालुक्यांतील एकूण 5 रुग्ण आहेत. तर, जुनी सांगवी येथील पाच वर्षीय मुलाला देखील करोनाची लागण झाली असून त्याला देखील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.