जुन्नर(प्रतिनिधी) – गोवंश जातीच्या जनावरांची अवैध वाहतूक व विक्री जुन्नर परिसरात सुरूच असून आता या जनावरांचे मांस पाण्याच्या कॅनमध्ये लपवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून जुन्नर पोलिसांनी येथे अनेक ठिकाणी छापे घालून मांस जप्त केले आहे तसेच जिवंत जनावरांची सुटका केली आहे. या धडक कारवाईने सदर इसम विविध युक्त्या शोधत आहेत. गेल्या आठवड्यात केलेल्या कारवाई मध्ये जनावरांना ओढ्याजवळील झुडपात लपवून ठेवले होते. जुन्नर पोलिसांच्या केलेल्या कारवाईच्या या सलग सत्रामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की रविवारी (दि. २४) गस्तीवरील पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी कसाईवाड्यात पोलिसांनी छापा मारला. या ठिकाणी काही इसमांच्या घरालगतच्या खोलीत प्लास्टिक व स्टीलच्या टबमध्ये जनावरांचे मांस आढळून आले. याशिवाय थंड राहण्याऱ्या पाण्याच्या जारमध्येही जनावरांचे मांस विक्री करिता ठेवलेले आढळून आले. याप्रकरणी कादीर कुरेशी, शहरूक बेपारी, शाबीर कुरेशी, बाबू बेपारी (सर्व रा.- कसाईवाडा, जुन्नर) यांच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलीस निरीक्षक युवराज मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक मिलिंद साबळे, मुकुंद पालवे, ज्ञानेश्वर बेंदरे, स्मिता नवघरे, पोलिस कर्मचारी नवनाथ वायाळ, नारायण खंडागळे, बाळासाहेब पवार, राजेंद्र बुरुड, नदीम तडवी आदींनी सहभाग घेतला होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बेंदरे, पोलिस हवालदार भरत सुर्यवंशी करीत आहेत.