आठ मृत्यू; 73 रुग्णांची प्रकृती चिंताजनक
पिंपरी (प्रतिनिधी) : पिंपरी चिंचवड शहरात आज नवीन 335 करोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तसेच 8 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरातील एकूण रुग्णसंख्या 7276 वर पोहचली आहे.
शहरातील रुग्णसंख्येने आज सात हजारांचा टप्पा ओलांडला. रविवारी सायंकाळपर्यंत शहरात 335 करोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामध्ये शहरातील 318 रुग्णांचा समावेश आहे. तर शहराबाहेरील 17 जणांना करोनाची लागण झाली आहे.
आज शहरात आठ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील पिंपरी, आकुर्डी, सांगवी येथील चार पुरुष व चऱ्होली येथील एका महिलेचा समावेश आहे. तर शहराबाहेरील मारुंजी, बीड येथील दोन पुरुष व देहूरोड येथील एका महिलेचा समावेश आहे. आतापर्यंत शहरात 146 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमधील 107 रुग्णांचा समावेश आहे.
शहरात मागच्या बारा दिवसांत तब्बल 60 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यसस्थितीत शहरात 2649 रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यामध्ये 184 रुग्ण हे महापालिका हद्दीच्या बाहेरील आहेत. शहरातील उपचाराधीन असलेल्या रुग्णांपैकी 2050 रुग्णांमध्ये कोणतेही लक्षणे नाहीत. तसेच 431 रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळत आहेत. तर 73 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान, आज दिवसभरात 318 रुग्णांना घऱी सोडण्यात आले. त्यामुळे रुग्णालयातून घऱी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 4312 इतकी झाली आहे. तर रविवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत 683 संशयित रुग्णांना महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहे. मागील तीन दिवसांतील 2083 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
महापालिकेच्या वतीने कन्टेंन्मेंट झोनमध्ये सर्वेक्षण करण्यात येत आहे. आज बाधित क्षेत्रातील 20 हजार 198 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये 65 हजार 619 नागरिकांची माहिती घेण्यात आली आहे.