अर्थव्यवस्थेतील उष:काल दृष्टिपथात – शक्‍तिकांत दास

सर्व क्षेत्रांतील उत्पादकता वेगाने पूर्वपदावर

मुंबई – लॉक डाऊनमुळे कोलमडलेली अर्थव्यवस्था आता लॉक डाऊन कमी करण्यात आल्यामुळे वेगाने पूर्ण पूर्वपदावर येऊ लागली असल्याचा दावा रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्‍तिकांत दास यांनी केला आहे.

लॉकडाऊन योग्यवेळी सुरू करण्यात आल्यामुळे भारताची जास्त मनुष्यहानी झाली नाही. ही सुदैवाची गोष्ट आहे. मात्र, नागरिकांच्या आत्मविश्‍वासावर परिणाम झालेला आहे. तो विश्‍वास पुन्हा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सातव्या बॅंकिंग परिषदेत बोलताना सांगितले. भारतातील व्यापाऱ्यांनी आणि कंपन्यांनी अभूतपूर्व परिस्थितीला योग्य प्रकारे तोंड दिले आहे. मानवी इतिहासामध्ये अशा प्रकारचा पेच पहिल्यांदाच निर्माण होऊनही सर्वांनी समजूतदारपणे वाटचाल केली.

उत्पादकता पूर्वपदावर येत असले तरी पुरवठासाखळी पूर्ववत होण्याची गरज आहे. लोकांचा आत्मविश्‍वास परत येऊन मागणी वाढण्याची गरज आहे. यासाठी लागणारा कालावधी कमी करण्यासाठी सर्वांनी सामूहिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बॅंकेने सर्व परिस्थितीचा तपशिलात अभ्यास करून योग्य वेळी आवश्‍यक ती मदत दिली आहे. या मदतीचा वापर उद्योग आणि व्यापाऱ्याकडून योग्य प्रमाणात होऊ लागला आहे.

सध्याच्या परिस्थितीत रिझर्व्ह बॅंकेला अतिशय संतुलित भूमिका घ्यावी लागत आहे. बॅंकिंग व्यवस्था मजबूत राहावी, वित्तीय स्थिरता मजबूत राहावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचबरोबर भविष्यातील विकासासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना कराव्या लागत आहेत. कदाचित लॉकडाऊन पूर्णपणे संपुष्टात आल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था पूर्वीपेक्षा अधिक वेगाने वाटचाल करू लागेल. कारण यातून नावीन्यपूर्ण मार्ग काढण्यासाठी विविध क्षेत्रात विचार विनिमय चालू आहे.

वित्तीय क्षेत्र पूर्णपणे पूर्वपदावर आल्यानंतरच इतर क्षेत्र पूर्वपदावर येतील. मात्र या क्षेत्राने बाह्य मदतीऐवजी जास्तीत जास्त स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले. रिझर्व्ह बॅंकेने जेवढे शक्‍य होते तेवढे केले आहे. व्याजदर बरेच कमी करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर कर्ज घेणाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून कर्जाचे हप्ते देण्याची मुदत सहा महिन्यांपर्यंत वाढविण्यात आलेली आहे, असे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.