पिंपरी – पिंपरी चिंचवडकर गेले काही दिवस उकाड्याने त्रस्त झाले असून या उकाड्यापासून त्यांची काहीशी सुटका होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. नागरिक आतुरतेने थंडीची प्रतीक्षा करत आहेत परंतु उन्हाळ्याप्रमाणे उकाडा सहन करावा लागत आहे. परंतु आता रात्रीच्या तापमानात घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तेज या चक्रीवादळामुळे तापमानात घट होण्याची शक्यता असून 22 ते 25 ऑक्टोबर दरम्यान किमान तपमानात 16 ते 17 राहिल, अशी शक्यता वर्तविली आहे.
गेला आठवडाभर नागरिक अंशतः ढगाळ वातावरणाचा अनुभव घेत आहेत. ढगाळ वातावरणामुळे नागरिक घामाघूम होत आहेत. दोन दिवसांपूर्वी शहरात पावसाने हजेरी लावली होती. हवामान विभागानुसार आज पिंपरी चिंचवड व पुणे शहरातील हवामानात बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या पूर्वेकडील वाऱ्यांद्वारे काही प्रमाणात आर्द्रता येण्याची शक्यता आहे. तर, आकाश अंशतः ढगाळ असण्याची अपेक्षा आहे.
शहराच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. हवामान विभागानुसार 18 ऑक्टोबर रोजी आग्नेय आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. ते पश्चिम-वायव्य दिशेकडे सरकण्याची आणि 21 ऑक्टोबरपर्यंत तीव्रतेने दबाव निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या चक्रीवादळामुळे रात्रीच्या तापमानात घट होऊ शकते. पिंपरी चिंचवड शहरात 22 ते 25 ऑक्टोबर दरम्यान किमान 16 ते 17 अंशापर्यंत असेल. परिणामी नागरिकांना थंडीचा अनुभव घेता येणार आहे.