कोरेगाव – आमदार महेश शिंदे यांनी रस्ते मार्गाने संपूर्ण मतदारसंघाचा विकास करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सातारा आणि कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचे असलेले रस्ते आता चकाचक होणार असून, त्यासाठी 25 कोटी 15 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून प्रत्यक्षात कामाला आता सुरुवात होणार आहे.
कोरेगाव तालुक्यातील अनेक रस्त्यांवरुन शेती मालाची वाहतूक करणे मुश्किल बनले होते, ही बाब स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी आमदार महेश शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यांनी तात्काळ बांधकाम विभागाला सर्वेक्षण करुन परिपूर्ण अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अंदाजपत्रकांना राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
भाडळे आणि वाठार स्टेशन विभाग जोडण्यासाठी हिवरे खिंड फोडणे अत्यंत गरजेचे होते. खिंड रस्ता नसल्याने भाडळे खोऱ्यातील शेतकरी व शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी किन्हई- सातारारोडमार्गे वळसा घालावा लागत होता. त्यासाठी वेळ आणि पैसा खर्च होत होता.
ग्रामविकास मंत्री गिरीशमहाजन यांनी या कामासाठी वाढीव निधी म्हणून 7 कोटी 50 लाख रुपये देण्यास तत्वत: मान्यता दिली आहे. यामुळे भाडळे आणि वाठार स्टेशन विभाग एकमेकांशी जोडले जाणार आहेत. तळिये ते नलवडेवाडी या रस्त्यासाठी 3 कोटी 28 लाख 10 हजार रुपये, कुमठे- सांगवी- चिमणगाव रस्त्यासाठी 3 कोटी 28 लाख 87 हजार 900 रुपये
कुमठे- गोळेवाडी- सुलतानवाडी- एकसळ रस्त्यासाठी 3 कोटी 94 लाख 57 हजार रुपये, तडवळे संमत कोरेगाव- भोसे- चिमणगाव रस्त्यासाठी 3 कोटी 4 लाख 10 हजार रुपये, सातारा- लातूर महामार्ग- सातारा रेल्वे स्टेशन- महागाव- चिंचणेर संमत निंब या रस्त्यासाठी 2 कोटी 52 लाख 20 हजार रुपये, पुणे- बंगळुरु महामार्ग ते वळसे- देगाव- जैतापूर रस्त्यासाठी 2 कोटी 64 लाख 13 हजार रुपये आणि वनगळ ते आरफळ-सातारा-लोणंद रस्ता या रस्त्यासाठी 4 कोटी 26 लाख 22 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
कोरेगावकरांसह लगतच्या वाड्या वस्त्यांसाठी सुसज्ज बायपास
आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव शहरासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला असून आणखी निधी मंजुरीच्या टप्प्यात आहे. कोरेगाव शहरात चारही बाजूने येणाऱ्या रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण केले जात आहे. त्याचबरोबर लगतच्या वाडीवस्तीवर रस्ते नव्याने तयार केले जात आहेत. सातारा- लातूर महामार्ग आणि खंडाळा- शिरोळ- जयसिंगपूर राज्यमार्गाला जोडणाऱ्या कुमठे- गोळेवाडी- सुलतानवाडी- एकसळ या रस्त्यासाठी 3 कोटी 94 लाख 57 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या बायपास रस्त्यामुळे कुमठे, गोळेवाडी, सुलतानवाडीसह एकसळ परिसराला त्याचा लाभ होणार आहे.