पिंपरी-चिंचवड : पुरेसा पुरवठा न झाल्यास लसीकरणात येईल बाधा

सहा लाखांहून अधिक लाभार्थी : महापालिकेकडे 63 हजार 866 लसींचा साठा

पिंपरी – शहरात 67 ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करून 45 वर्षांवरील सर्वांना लस देण्यास सुरूवात केली आहे. शहरामध्ये 45 वर्षावरील 4 लाख 57 हजार 500 नागरिक आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि फ्रटंलाइन वर्कर्सचेही दोन डोस अद्याप पूर्ण झाले नाही. पालिकेने 31 मार्चपर्यंत 1 लाख 20 हजार जणांना करोनाची लस दिली आहे. त्यापैकी केवळ 14 हजार 987 जणांना दुसरा डोस देण्यात आला होता. हे पाहता सुमारे सहा लाख लोकांना पालिकेला लस द्यावी लागणार आहे. असे असताना लसींचा साठा केवळ 63 हजार 866 इतका आहे. त्यामुळे वेळेत लसीचा पुरवठा न झाल्यास शहरातील लसीकरणामध्ये बाधा येऊ शकते.

शासन आदेशानुसार 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना लस देण्यास सुरुवात केली आहे. शहरामध्ये 45 वर्ष वयावरील नागरिकांची संख्या 4 लाख 57 हजार एवढी आहे. याशिवाय हेल्थ वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व 60 वर्षावरील सर्व नागरिकांनाही ही लस देण्यात येत आहे. 16 जानेवारीला शहरामध्ये करोना प्रतिबंधक लस देण्यासाठी सुरूवात झाली. सुरूवातीला यामध्ये हेल्थ वर्कर यांना प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर 15 फेब्रुवारीपासून शहरातील हेल्थ वर्कर यांच्यासोबतच फ्रंट लाइनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही लस देण्यास सुरुवात केली. तसेच हेल्थ वर्कर यांना दुसरा डोस देण्यास सुरूवात केली. 1 मार्चपासून 60 वर्षावरील नागरिक व गंभीर आजार असणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास सुरुवात केली.

तर आता 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
सद्यस्थितीत महापालिका प्रशासनाकडे केवळ 63 हजार 866 लसींचा साठा आहे. त्यामध्ये कोव्हिशिल्ड 62,876 तर कोव्हॅक्‍सिन 990 डोस शिल्लक आहे. शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 42 हजार इतकी झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने लसीकऱणावर भर दिला आहे. परंतु पुढील काळात पुरेशा लसींचा पुरवठा झाला नाही तर लसीकरणाला ब्रेक लागण्याची शक्‍यता आहे.

लसीकरणासाठी 67 केंद्रे
करोनाने होणाऱ्या मृत्यूमध्ये 80 टक्के 45 वर्षांवरील नागरिकांचा समावेश आहे. मृत्यू रोखण्यासाठी 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. शहरातील 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्यासाठी शहरातील 67 केंद्रांवर लस देण्यात येत आहे. लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करायची आहे. किंवा जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन तिथे नोंदणी करता येणार आहे. आधार कार्ड, मतदार ओळखपत्र याशिवाय पासपोर्ट, रेशनकार्ड दाखवून नोंदणी केली जात आहे.

अवघ्या 15 हजार जणांनाच मिळाला दुसरा डोस
मागील अडीच महिन्यांचा विचार करता शहरामध्ये लसींचा अत्यल्प पुरवठा झाला आहे. तसेच आहे त्या प्रमाणातही पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाला लसीकरण वाढविण्यात यश आले नाही. आतापर्यंत शहरात 1 लाख 20 हजार 492 हेल्थ वर्कर, फ्रंटलाइन वर्कर व ज्येष्ठ नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे. त्यामध्ये 20 हजार 924 आरोग्य सेवक, फ्रंटलाइन वर्कर्स 16,404, 60 वर्ष व त्यापुढील ज्येष्ठ नागरिक 68,868 व 45 ते 59 वर्षातील सहव्याधी असलेल्या 14,327 नागरिकांचा समावेश आहे. आतापर्यंत फक्त 14,987 जणांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. त्यामध्ये आरोग्य सेवक 10,216, फ्रंटलाईन वर्कर्स 4,621, ज्येष्ठ नागरिक 117 व 45 ते 59 वर्ष सहव्याधी असलेल्या 33 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.