पिंपरी – पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी पतीला भर रस्त्यात दम भरला. यामध्ये पतीला मेंदूचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना दिघी येथे शुक्रवारी (दि. 13) दुपारी घडली. त्यानंतर पतीच्या नातेवाईकांनी मृतदेह पोलीस ठाण्यात आणल्याने एकच खळबळ उडाली. मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी मृतदेह घेऊन पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 14) ठिय्या मांडला. या प्रकरणात आमदार महेश लांडगे यांचे बंधू कामगार नेते सचिन लांडगे यांना मध्यस्थी करावी लागली. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. या प्रकरणात दिघी पोलीस ठाण्यातील एका पोलीस अंमलदाराने मयत व्यक्तीला धमकावल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे.
ऋषभ मुकुंद जाधव (वय 34 रा. दिघी) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ऋषभ जाधव आणि त्यांच्या पत्नीचा सन 2019 पासून कौटुंबिक कारणावरून न्यायालयात वाद सुरू आहे. ऋषभ यांनी त्यांच्या पत्नीला घरात राहण्यासाठी पैसे देणे अथवा त्यांना दुसऱ्या घराची सोय करून देणे अथवा त्यांना दुसरे घर भाड्याने घेऊन देणे असा खडकी न्यायालयाने अंशतः निकाल दिला होता. ऋषभच्या पत्त्नीने पोलिसांकडे मदत मागितल्याने दिघी पोलिसांनी ऋषभ यांना फोन करून पोलीस ठाण्यात बोलावून घेतले व न्यायालयाच्या निकालाबाबत सांगितले. पोलीस ठाण्यातून घरी जात असताना ऋषभ यांनी पत्नीला बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ऋषभ यांची पत्नी, तिची आई, वडील, भाऊ आणि अन्य दोन महिलांनी घेराव घालून ऋषभ यांना ढकलाढकली केली. त्यात ऋषभ खाली कोसळले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ऋषभ यांचा मेंदूचा झटका आल्याने झाल्याचे दिघी पोलिसांनी सांगितले.
पत्नीसह नातेवाईकांवर गुन्हा
ऋषभ यांच्या मृत्यू प्रकरणी मिलिंद पाटील यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ऋषभची पत्नी, तिची आई, वडील दत्तात्रय तापकीर, भाऊ वेदांत तापकीर आणि दोन महिलांच्या विरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शनिवारी (दि. 14) मध्यरात्री दीड वाजता दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋषभ जाधव यांच्या मृत्यूप्रकरणी जे दोषी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
सचिन लांडगे, कामगार नेते
नातेवाईकांनी दम दिल्यानंतर ऋषभ यांचा मृत्यू झाला. त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनतर देखील नातेवाईक ऋषभ यांचा मृतदेह घेऊन पोलीस ठाण्यात आले. त्यांना सर्व बाबी समजावून सांगितल्या आहेत. पुढील कारवाई दिघी पोलीस करीत आहेत.
जितेंद्र कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे)
अंत्ययात्रा पोलीस ठाण्यात आल्याने पोलिसांची धावपळ
दिघी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार संदीप कांबळे यांनी ऋषभ जाधव यांना धमकावले. त्यामुळे त्यांना धक्का बसून त्यात ऋषभ यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. पोलीस अंमलदार कांबळे यांच्या विरोधात कठोर कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी नातेवाईकांनी केली. शनिवारी सकाळी ऋषभ यांची अंत्ययात्रा दिघी येथील घरातून निघाली. त्यांच्यावर भोसरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र मॅगझीन चौकातून ही अंत्ययात्रा थेट दिघी पोलीस ठाण्यात आली. ऋषभ यांचा मृतदेह शववाहिनीत ठेऊन नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. स्मशानभूमीत निघालेली अंत्ययात्रा अचानक पोलीस ठाण्यात आल्याने पोलीस अधिकाऱ्यांचा देखील गोंधळ उडाला. पोलीस उपायुक्त विवेक पाटील, सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी दिघी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
सचिन लांडगे यांची मध्यस्थी
पोलीस अंमलदार कांबळे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ऋषभ यांचे नातेवाईक दिघी पोलीस ठाण्यासमोर जमले. अचानक आलेला जनक्षोभ हाताळताना दिघी पोलिसांची दमछाक झाली. उपायुक्त, सहायक आयुक्त आल्यानंतर देखील नातेवाईकांनी माघार घेतली नाही. शेवटी पोलिसांनी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे बंधू कामगार नेते सचिन लांडगे यांना बोलावून मध्यस्थी करण्यास सांगितले. सचिन लांडगे यांनी मध्यस्थी करत नातेवाईकांची समजूत काढून ऋषभ यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास अंत्ययात्रा पाठवून दिली.