पुणे – ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला अवघ्या दीड मिनिटात चीतपट करत 65 व्या राज्य अजिंक्यपद कुस्ती व प्रतिष्ठेच्या ‘महराष्ट्र केसरीची गदा’ पटकावली. शिवराज राक्षेच्या रूपाने महाराष्ट्राला नवा ‘महाराष्ट्र केसरी’ मिळाला आहे. तर, स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या महेंद्र गायकवाड याला उपमहाराष्ट्र केसरीवर समाधान मानावे लागले.
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याला मानाची गदा, महिंद्रा थार ही गाडी व रोख पाच लाख रुपयांचे बक्षीस तर उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड याला मानाची गदा, ट्रक्टर व रोख अडीच लाख रुपये देवून सन्मानित करण्यात आले. तर, दुसरीकडे महाराष्ट्र केसरी झालेल्या शिवराजला आणखी एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे.
शिवराजला शासकीय नोकरीत प्रथम प्राधान्य देणार असल्याचा शब्द राज्याचे मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी ट्विट करत शिवराजचं अभिनंदन केलं. त्यानंतर सरकारी नोकरीत प्राधान्य देणार असल्याचं देखील म्हटलंय.
आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरूनगर चा मल्ल शिवराज राक्षे विजयी ठरला आहे. या विजयानंतर त्याला चांदीची गदा आणि 5 लाख रुपये रोख तसेच थार गाडी बक्षीस म्हणून देण्यात आली आहे.
मॅटवर रंगलेल्या या अत्यंत चुरशीच्या सामन्यात प्रतिस्पर्धी मल्ल महेंद्र गायकवाड याला चितपट करणाऱ्या महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याचे मी मनापासून अभिनंदन करतो. तसेच राज्य सरकारकडून महाराष्ट्र केसरी विजेत्या खेळाडूला सरकारी नोकरीत नक्की प्राधान्य देण्यात येईल असेही जाहीर करतो.’ या आशयाचे ट्विट त्यांनी केलं आहे.
प्रतिष्ठेच्या #महाराष्ट्र_केसरी #कुस्ती स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरूनगर चा मल्ल शिवराज राक्षे विजयी ठरला आहे. या विजयानंतर त्याला चांदीची गदा आणि ५ लाख रुपये रोख तसेच थार गाडी बक्षीस म्हणून देण्यात आली आहे.#MaharashtraKesari pic.twitter.com/e1sTXOPjvM
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 14, 2023
दरम्यान, महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतीत शिवराज व महेंद्र हे दोघेही तुल्ल्यबळ मल्ल यांनी एकमेकाना आजमावायला सुरुवात केली. मात्र यावेळी शिवराज राक्षेला पंचाकडून कुस्ती करण्याची ताकीद मिळाली. त्यानंतर 40 व्या सेकंदाला महेंद्रला देखील कुस्तीची ताकीद मिळाली.
मॅटवर रंगलेल्या या अत्यंत चुरशीच्या सामन्यात प्रतिस्पर्धी मल्ल महेंद्र गायकवाड याला चितपट करणाऱ्या महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याचे मी मनापासून अभिनंदन करतो. तसेच राज्य सरकारकडून महाराष्ट्र केसरी विजेत्या खेळाडूला सरकारी नोकरीत नक्की प्राधान्य देण्यात येईल असेही जाहीर करतो.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 14, 2023
त्यावेळी बलदंड ताकदीच्या शिवराज राक्षेने दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न महेंद्रने हाणून पाडण्याच्या प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी शिवराजने महेंद्रवर ताबा घेण्याचा प्रयत्न करताना महेंद्रला दाबून टाकत चीतपट करताना महाराष्ट्र केसरीवर आपले नाव कोरले. शिवराजच्या विजयानंतर प्रेक्षकांनी एकाच जल्लोष केला.