पिंपरी – प्रभाग क्रमांक 2 जाधववाडी येथे नवीन शाळा बांधण्याचे काम सुुरु आहे. शाळेच्या इमारतीत विद्युत विषयक कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी 1 कोटी 78 लाख 56 हजार रुपये खर्च होत आहे. शैक्षणिक विकासाच्या नावाखाली करोडो रुपये खर्च केले जातात. मात्र, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्यावर भर दिला जात नाही. यामुळे पायाभूत सुविधांसह विद्यार्थी केंद्रीत शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर भर देण्याची गरज असल्याचे मत विद्यार्थ्यांच्या पालकांमधून व्यक्त केले जात आहे.
महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून जाधववाडी येथे नवीन शाळा बांधण्याचे काम सध्या युध्दपातळीवर सुरु आहे. शाळा बांधण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आता अंतर्गत उर्वरीत विद्युत विषयक कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्या कामासाठी येणाऱ्या 1 कोटी 15 लाख 97 हजार 892 रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत विचार केला जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. पालिकेच्या शाळेत सामान्य कुटुंबातील मुलांनाच प्रवेश घेतला जातो. ज्यांची आर्थिक परिस्थिती मोजकी आहे, अशा नागरिकांना पालिकेच्या शाळेत प्रवेश घेण्याशिवाय पर्याय नसतो. सामान्य कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याबाबत केवळ फक्त चर्चा केली जाते, शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र, खरोखर विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जाते का, याबाबत कोणीच विचार करत नसल्याची वस्तुस्थिती आहे.
..म्हणून पटसंख्येची घसरण
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एकूण 105 प्राथमिक शाळा आहेत. 16 माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये सुमारे 43 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वेळेत दिले जात नाही. प्रयोग वह्या, पुस्तके सहामाही सत्र संपल्यानंतर दिले जाते. शालेय साहित्यच वेळेत मिळत नसल्यामुळे अभ्यासक्रमही वेळेत पूर्ण होत नाही. परिणामी, विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळताना दिसत आहे. विशेष म्हणजे शिक्षकांची मानसिकता देखील गुणवत्ता वाढविण्यास अनुकूल दिसत नाही. सध्या शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीत गुंतले आहेत. सुमारे 150 हून अधिक शिक्षकांना रितसर सुट्टी दिल्याची माहिती समजते. मात्र, अधिकारी याबाबत स्पष्ट मत व्यक्त करायला तयार नाहीत. त्यामुळे शिक्षक आणि अधिकारी यांच्या बेजबाबदार वागण्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. गुणवत्ता वाढत नसल्यामुळे पटसंख्याही कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे.