पिंपरी – थेरगाव येथील प्रेरणा को ऑप बँक लिमिटेडच्या रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक श्रीधर धोंडीराम वाल्हेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, पुणे शहरचे अध्यासी अधिकारी बी. एल. साबळे यांनी काम पाहिले.
याप्रसंगी चेअरमन कांतीलाल गुजर, संस्थापक तुकाराम गुजर, ज्येष्ठ संचालक सुरेश पारखी, गबाजी वाकडकर, राजाराम रंदिल, संतोष मुंगसे, संजय पठारे, अक्षय गुजर, नाना शिवले, राजेंद्र शिरसाठ, सीए नंदकिशोर तोष्णीवाल, अॅड. अजितकुमार जाधव, सुजाता पारखी, चंद्रभागा भिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी सोनवणे उपस्थित होते.
निवडीबद्दल चेअरमन कांतीलाल गुजर आणि संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले. कांतीलाल गुजर यांनी बँकेचा आढावा घेताना सभासद, खातेदार, ठेवीदार यांचा विश्वास जपत आधुनिक बँकिंगचा अधिकाधिक वापर केला असल्याचे नमूद केले. ग्राहकांचे हित आणि ग्राहकांचा विश्वास जपत बँक प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचे ते म्हणाले. प्रेरणा बँकेचे यंदाचे वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष आहे.
बँकेच्या ४४२ कोटींच्या ठेवी आणि २१९ कोटींचे कर्ज वाटप असा एकूण ६६१ कोटी रूपयांचा एकूण व्यवसाय आहे. शहर आणि जिल्हा परिसरात बँकेच्या १५ शाखा आहेत. या आर्थिक वर्षात बँकेचा ग्रॉस एनपीए ३.८६ टक्के तर नेट एनपीए टक्के शून्य टक्के आहे. आज पर्यंत बँकेला सतत ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला असल्याचे गुजर म्हणाले.