पिंपरी – चिखली येथील वाघू साने चौक ते चिंचेचा मळा मार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे. हे पाणी पावसामुळे साचलेले नसून महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे रस्ता जलमय झाला आहे. गुरुवारी (दि. 25) दुपारी स्टॉर्म वॉटरलाइन तुंबल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे. येथील स्टॉर्म वॉटरलाइनची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
चिखली, मोरेवस्ती, साने चौक आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर ड्रेनेजलाइनच्या समस्या आहेत. वारंवार ड्रेनेजलाइन, स्टॉर्म वॉटर लाइन तुंबत असल्याने दूषित पाणी रस्त्यांवर वाहत आहे. परंतु महापालिकेचा ड्रेनेजलाइन विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
वाघू साने चौक ते चिंचेचा मळा या मार्गावर वाहनांची व नागरिकांची मोठी वर्दळ असते. मोरेवस्तीतील अष्टविनायक चौक, चिंचेचा मळा, विठ्ठल नगर, झेंडा चौक आदी लहान मोठ्या सोसायट्या यांना ये-जा करण्यासाठी हा मार्ग प्रमुख आहे. परंतु मागील तीन दिवसांपासून या मार्गावर मोठ्या प्रमाणावर दूषित पाणी वाहत असल्याने रस्ता जलमय झाला आहे. त्यामुळे पादचारी व दुचाकी वाहनचालकांना येथून ये-जा करताना अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावर गुडगाभर पाणी साचून राहिल्याने सायकलस्वार, चारचाकी वाहनांना अडचणी येत आहेत.
शासकीय सुटींमुळे दुर्लक्ष
महापालिकेला लागोपाठ शासकीय सुटी आल्यामुळे स्थानिक नागरिकांनी तक्रार करून देखील कोणीच दखल घेत नाही. त्यामुळे चार दिवसांपासून चिखलीकर नागरिक महापालिकेच्या नियोजनशून्य कारभाराने त्रस्त आहेत. मोरेवस्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार व सर्वसामान्य नागरिक वास्तव्यास आहे. त्यांना रात्रीअपरात्री कामावर ये-जा करावी लागत आहे. परंतु रस्ताच जलमय झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. स्टॉर्म वॉटरलाइनचे अधिकारी, अभियंता, महापालिकेच्या संबंधित विभागाच्या कर्मचार्यांना वारंवार तक्रार करून देखील कोणीच याकडे लक्ष देत नसल्याने महापालिकेच्या कामकाजाविषयी नागरिकांमध्ये नाराजी आहे.
महापालिकेच्या अधिकार्यांना व सारथीवर तक्रार करून देखील कोणीच दखल घेत नाही. अधिकारी केवळ टोलवाटोलवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे करदाता सर्वसामान्य नागरिक महापालिकेच्या नियोजन शून्य कारभाराचा बळी ठरत आहे. त्यांना दूषित पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. कामात कुचराई करणार्या अधिकारी व कर्मचार्यांवर महापालिका आयुक्तांनी कारवाई करावी.
– पांडुरंग साने, सामाजिक कार्यकर्ते.