पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान डेंग्यूच्या रुग्णांचा आलेख वाढत होता. नोव्हेंबरमध्ये रुग्णसंख्या कमी झाली आहे.
शहरामध्ये जुलै महिन्यापासून डेंग्यूचे बाधित रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. जुलैमध्ये 36 , ऑगस्टमध्ये 52, सप्टेंबरमध्ये 60 तर ऑक्टोबरमध्ये तब्बल 81 रुग्ण आढळले होते. नोव्हेंबर महिन्यात 28 तारखेपर्यंत 22 रुग्ण आढळले आहेत.
नोव्हेंबर महिन्यात हिवतापाचे (मलेरिया) दोन रुग्ण आढळून आले आहेत. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात प्रत्येकी केवळ 1 बाधित रुग्ण आढळला होता. या बरोबरच चिकुनगुणियाचे जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत 52 संशयित रुग्ण आढळले आहेत. मात्र, त्यामध्ये एकही बाधित रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आपण खबरदारी म्हणून आधीपासूनच उपाययोजना सुरू केल्या आहेत. औषध आणि धूर फवारणी चालू आहे. संशयित रुग्ण आढळल्यास त्या ठिकाणी योग्य खबरदारी घेत आहे. तापाचे रुग्ण आढळल्यानंतर त्यांच्यावर त्वरीत उपचाराची सुविधा दिली जात आहे. त्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यू व इतर आजाराचे रुग्ण कमी आहेत.
– डॉ. अभयचंद्र दादेवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी
पावसाळ्यात साथीच्या आजारांमध्ये मोठी वाढ होत असते. साचलेले पाणी, कचरा, परिसरात असणारी अस्वच्छता हे याचे कारण ठरत आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने खबरदारी म्हणून कंटेनर सर्व्हे केला जात आहे. यामध्ये भंगाराची दुकाने, नागरिकांची घरे आदीसह विविध ठिकाणाची पाहणी केली जाते. महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या सर्व्हेत शहरात डेंग्यूच्या रुग्णांची वाढ होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्या नुसार महापालिकेने खबरदारी म्हणून पाऊले उचलली होती.