पिंपरी – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (पीएमआरडीए) मुख्य अधिकाऱ्यांची निवडणूक कामाकाजासाठी नियुक्ती झाली आहे. हे दोन्ही वरिष्ठ अधिकारी व्यस्त असल्याने दैनंदिन कामकामावर याचा परिणाम जाणवू लागला आहे. नागरिकांशी संबंधित महत्वाची व अत्यावश्यक कामे थांबू नयेत, यासाठी ई-मेलच्या माध्यमातून आवश्यक मंजुरी घेतली जात आहे.
पीएमआरडीएचे महानगर आयुक्त राहुल महिवाल आणि अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला हे सध्या इलेक्शन ड्युटीवर आहेत. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी आयुक्त महिवाल तर, तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी सिंगला यांच्यावर निवडणूक निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार ते 9 नोव्हेंबरपासून इलेक्टशन ड्युटीवर आहेत. 3 डिसेंबरला या दोन्ही विधानसभांसाठी मतमोजणी होणार आहे. तोपर्यंत महिवाल आणि सिंगला हे संबंधित विधानसभा क्षेत्रांमध्ये कामकाज पाहणार आहेत. तथापि, पीएमआरडीएचे कामकाज थंडावले आहे.
पीएमआरडीएचे कार्यक्षेत्र 7256.46 किलो मीटर क्षेत्रावर विस्तारले आहे. या परिक्षेत्रात 843 खेड्यांचा समावेश असून तेथील लोकसंख्या सुमारे 72 लाख 76 हजार एवढी आहे. येथील नागरिक जमिनीसंदर्भात आवश्यक परवानग्या घेण्यासाठी दुरुन पीएमआरडीए कार्यालयात येत असतात. शिवाय, पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे महापालिका, देहूरोड-खडकी-पुणे कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत करोडो रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत. त्याचबरोबर पुणे परिसरातील सात नगर परिषदांच्या हद्दीत देखील रिंगरोडचे भूसंपादन सुरू आहे. नगर रचना योजना (टीपी स्कीम) राबविण्यात येत आहेत. त्यावरील शेतकऱ्यांच्या हरकतींवर सुनावणी प्रलंबित आहे. मुख्य अधिकारी परप्रांतातील निवडणूक कार्यात व्यस्त असल्यामुळे ही कामे रखडली आहेत.
प्रशासनाचा दावा
पीएमआरडीएचे महानगर आयुक्त राहुल महिवाल आणि अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला यांची निवडणूक विषयक कामासाठी नियुक्ती झालेली आहे. प्रशासकीय कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी ई-मेलद्वारे टिप्पण्या पाठवून त्यांची मंजुरी घेतली जात आहे, असा दावा पीएमआरडीए प्रशासनाकडून करण्यात आला आहे.