पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात उशिरा कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे लेट लतीफांचे धाबे दणाणले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, 20 जुलै रोजी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे सकाळी दहाच्या सुमारास आयुक्तालयात आले. दरम्यान, त्यांच्या वाहनांचा ताफा येत असताना काही पोलीस कर्मचारी टंगळमंगळ करीत निवांत चालत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे चौबे यांचा पारा चढलेला होता.
कार्यालयात आल्यानंतर अनेक अधिकारी आपल्या जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत आणखी माहिती घेतली असता काहीजण दररोज उशिरा येत असल्याचे समजले. सहाय्यक आयुक्त भास्कर डेरे यांना सर्वांच्या ड्युटीवर येण्याच्या वेळा तपासण्याचे आदेश दिले. त्यानुसार, डेरे यांनी सर्व विभागांमध्ये जाऊन नोंद घेतली. त्यावेळी अनेकजण अकराच्या पुढे ड्युटीला येत असल्याची माहिती समोर आली. याची दखल वरिष्ठ पातळीवर घेऊन संबंधित लेट लतीफांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून सात दिवसांत खुलासा करण्यास सांगितले आहे.
कर्तव्यात कसुरी केल्याचा ठपका
कर्तव्यार्थ अनधिकृतपणे गैरहजर राहून कर्तव्याप्रती निष्काळजीपणाचे कसुरी केल्याचा ठपका उशिरा येणाऱ्या पोलिसांवर ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1981 मधील नियम 3 चे उल्लंघन करुन शासकीय सेवकास अशोभनीय असे गैरवर्तन केल्याचे नोटीसमध्ये नमूद आहे. तसेच, संबंधित पोलिस महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 25 व महाराष्ट्र पोलीस (शिक्षा व अपिले) नियम 1956 मधील तरतुदीनुसार कार्यवाहीस पात्र असल्याचेही नोटीसद्वारे कळवण्यात आले आहे.