पिंपरी – वल्लभनगर परिसरात एका नामाकिंत कंपनीकडून मॉलचे काम सुरू आहे. यासाठी पाया खोदण्यात येत असून याची माती घेऊन जाणाऱ्या डंपरची संख्या मोठी आहे. माती घेऊन जाताना ही माती पुणे-मुंबई महामार्गावर पडत आहे. यामुळे पाठीमागून येणाऱ्या दुचाकी चालकांसह चारचाकी चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या कंपनीला महापालिकेच्या वतीने नोटीस देण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली आहे.
पुणे-मुंबई महामार्गावर वल्लभनगर परिसरात एका नामाकिंत कंपनीकडून मॉल आणि शॉपिंग सेंटरचे काम सुरू आहे. यासाठी खोल पाया खोदला जात आहे. याठिकाणावरून निघणारी माती डंपरमध्ये भरून नेली जात आहे. मात्र, माती घेऊन जाताना संबंधित कंपनीकडून कोणतीही काळजी घेतली जात नाही.
माती उधळत रस्त्यावर पडत आहे. त्यामुळे रस्त्यावर मातीच-माती झाली आहे. या परिसरातून जाणाऱ्या-येणाऱ्या दुचाकी चालक, चारचाकी चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पावसाळ्यात या परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल झाला होता. दुचाकी चालक घसरून पडल्याच्या घटनांही याठिकाणी घडल्या होत्या. याबाबत काही नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केली आहे. त्यानंतर आता महापालिकेने पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे.
याबाबत शहर अभियंता मकरंद निकम म्हणाले, वल्लभनगर परिसरात एका कंपनीच्या बांधकाम साइटचे काम सुरू आहे. रस्त्यावर माती येऊन वाहन चालकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. याची पाहणी करून संबंधित कंपनीला नोटीस देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.