सातारा – कोंडवे (ता. सातारा) येथील रियल इस्टेटमधील व्यावसायिकाला दहा कोटी रुपयांचे कर्ज मिळवण्याचे आमिष दाखवून त्याची तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक येथील मीनल राजेंद्र गोसावी या महिलेवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोंडवे येथील प्लॉटिंग व फायनान्सचा व्यवसाय करत असलेल्या श्रीकांत अशोक भोसले यांना प्लॉटिंग करण्यासाठी कर्जाची आवश्यकता होती.
त्यांना त्यांच्या मुंबईतील मित्र किरण नचिते याने खासगी फायनान्स मिळण्यासाठी नाशिक येथील मीनल गोसावी यांचा मोबाइल क्रमांक दिला. ती कमी दरात खासगी फायनान्स मिळवून देत असल्याचे सांगितल्याने भोसले यांनी संपर्क केला असता मीनल गोसावी हिने 10 कोटी रुपये कर्ज मिळवून देते. मात्र, आठ लाख रुपये मला द्यावे लागतील असे तिने सांगितले. भोसले पैसे देण्यासाठी तयार झाल्यावरमीनल भोसले साताऱ्यातील राधिका रस्त्यावर साईराज हॉटेलमध्ये आली. भोसले यांना तिथे भेटण्यास बोलावून तुम्हाला 10 ऐवजी 15 कोटी रुपये कर्ज मंजूर होत आहे. मात्र, आठ लाख रुपये रोख द्या, असे तिने सांगितले.
पैशाची जुळणी झाल्यावर नाशिकला या, असे सांगून गोसावी निघून गेली. त्यानंतर दि. 4 फेब्रुवारी रोजी माझ्याकडे तीन लाख रुपये आहेत, तुम्ही सातारला या असे भोसले यांनी सांगितल्यावर गोसावी हिने ते पैसे तिच्या बॅंकेच्या खात्यावर भरण्यास सांगितले. पैसे भरल्यानंतर 15 दिवसांनी कर्ज मंजुरीबाबत विचारणा केली असता आज जमा होतील, उद्या जमा होतील असे सांगत गोसावी कर्ज देण्यास टाळाटाळ करु लागल्यावर तिला पोलीसात तक्रार करतो असे भोसले म्हणाले. त्यावर मीनल गोसावी हिने तुला काय करायचे ते करुन घे, अशी दमदाटी केली. तसेच भोसले यांचा फोन ब्लॅकलिस्टमध्ये टाकला. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर शेवटी श्रीकांत भोसले यांनी दि. 3 रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मीनल गोसावी हिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत.