पिंपरी – किटकजन्य आणि जलजन्य आजाराचे रुग्ण आढळून आल्यास त्यांची त्वरीत माहिती द्या, अशा सूचना पिंपरी चिंचवड महापालिका वैद्यकीय विभागाच्या वतीने शहरातील सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिक व क्लिनीक पॅथालॉजी लॅब यांना दिल्या आहेत. महापालिका कार्यक्षेत्रातील रुग्णांच्या बाबत माहिती देण्याचे परिपत्रक अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी नुकतेच जारी केले आहे. त्यामुळे शहरात साथीच्या आजाराची रुग्ण संख्या निश्चित होणार आहे.
सध्या पावसाळा सुरू असल्याने अनेकांना विविध आजारांनी विळखा घातला आहे. उपचारासाठी गेल्यानंतर खासगी रुग्णालयाद्वारे रक्त तपासणीच्या सूचना केल्या जात आहेत. त्यामध्ये आजार निष्पन्न होऊन पुढील उपचार केले जात आहेत. पावसाळ्यात डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया आदीसारख्या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्या रुग्णांची माहिती होण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरातील खासगी वैद्यकिय व्यवसायिकांना व क्लिनिक पॅथालॉजी लॅब यांना त्या बाबत माहिती देण्याची सूचना केली आहे.
कीटकजन्य व जलजन्य आजाराचा रुग्ण आढळून आल्यास अथवा उपचारासाठी दाखल झाल्यास त्याची परिपूर्ण माहिती, दवाखान्याचे नाव, रुग्णाचे नाव, वय पत्ता, उपचार घेतल्याची तारीख आदींचा अहवाल तयार करावा. हा अहवाल पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकिय विभागास कळवावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कॉलरा (पटकी), जापनीज इन्सेफलायटीस, डेंग्यु, संसर्गजन्य काविळ, गॅस्ट्रो इंट्रायटीस, लेप्टोस्पायरोसिस, मलेरिया, चिकुनगुनिया, शासन अधिसूचित करेल असे आजार इत्यादी आजारांचा यामध्ये समावेश आहे.
ही माहिती महापालिकेच्या विभागीय रुग्णालयाच्या ई-मेल आयडीवर व त्यानंतर लेखी स्वरुपात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संबधित विभागीय रुग्णालयास कळवावी, अशा सूचना वैद्यकीय विभागाने दिल्या आहेत. यामध्ये आकुर्डी येथील कै. हभप प्रभाकर मल्हारव कुटे रुग्णालय, तालेरा रुग्णालय, वायसीएम रुग्णालय, जिजामाता रुग्णालय, भोसरी रुग्णालय, यमुनानगर रुग्णालय, थेरगांव रुग्णालय आणि सांगवी रुग्णालयात माहिती देण्याची सूचना विभागाने केली आहे. अतिरिक्त आयुक्त (2) माहिती देण्यास टाळाटाळ झाल्यास किंवा दुर्लक्षित झाल्यास कायदेशी कारवाईचा इशाराही वैद्यकीय विभागाने दिला आहे.