पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय सुरू होऊन जेमतेम चार वर्ष झाली आहेत. या चार वर्षांच्या कालावधीत पाच पोलीस आयुक्त बदलण्यात आले. आजवर आलेल्या चार पोलीस आयुक्तांपैकी एकाही अधिकाऱ्याला आपला दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. चारही पोलीस आयुक्तांची मुदतपूर्व बदली झाली आहे. त्यामुळे शहरात आलेले नवे पोलीस आयुक्त तरी आपला दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
15 ऑगस्ट 2018 रोजी पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले. पहिले आयुक्त म्हणून अपर पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी आर के पद्मनाभन यांची नियुक्ती झाली. त्यांनी पहिल्या वर्षभरात आयुक्तालयाची घडी बसवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सन 2019 च्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागी भारतीय पोलीस सेवेतील अपर पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी संदीप बिष्णोई यांची 11 जुलै 2019 रोजी नियुक्ती करण्यात आली.
पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्त पदावर अपर पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी बसतील, असे आयुक्तालयाच्या निर्मितीच्या आदेशात म्हटले होते. सुरुवातीला आलेले दोन्ही आयुक्त अपर पोलीस महासंचालक दर्जाचे होते. मात्र, सप्टेंबर 2020 मध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी कृष्ण प्रकाश यांची आयुक्त म्हणून बदली झाली. त्यावेळी शहर आयुक्तांचे पदावतन करण्यात आले. त्यानंतर एप्रिल 2022 मध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी अंकुश शिंदे यांची वर्णी लागली. मात्र आता पुन्हा पद उन्नत करून अपर पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी विनय कुमार चौबे यांची नियुक्ती झाली आहे.
अंकुश शिंदे यांची 18 एप्रिल 2022 रोजी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. अवघ्या आठ महिन्यांत त्यांची नाशिक पोलीस आयुक्त पदावर बदली झाली आहे. मागील काही दिवसात शहर पोलीस दलात अनेक कारवायांमुळे अंकुश शिंदे विशेष चर्चेत राहिले. ऑनलाइन लॉटरी सेंटरवर धाडी पडल्यानंतर आयुक्तांनी अनेकांची उचलबांगडी करत चार जणांना निलंबित देखील केले. त्यांनतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर शिंदे यांनी दहा पोलिसांना निलंबितही केले.
सन 2020 मध्ये विनय कुमार चौबे यांना अपर पोलीस महासंचालक पदी बढती मिळाली आहे. मुंबई येथे अनेक वर्ष कामाचा त्यांचा अनुभव आहे. सध्या ते राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक म्हणून काम पाहत होते. तिथून त्यांना पिंपरी-चिंचवड शहराची जबाबदारी देण्यात आली आहे. चौबे हे सन 1995 च्या बॅचचे अधिकारी असून त्यांनी आयआयटी कानपूर येथून शिक्षण पूर्ण केले आहे.