पिंपरी – माझ्या यशात निर्माते, दिग्दर्शक, सहकलाकार या सर्वांचा मोठा वाटा आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखा आणि शहरवासीयांच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी प्रशांत दामले यांचा नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी मिलिंद कुलकर्णी यांनी प्रशांत दामले यांची प्रकट मुलाखत घेतली. तसेच आमदार उमा खापरे यांचा साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित गव्हाणे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेशचे रविकांत वर्पे, अभिनेत्री ब्रिंदा पारेख, राजेंद्र बंग, किरण भोईर, सुहास जोशी आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड सांस्कृतिक नगरी झाली पाहिजे असा प्रयत्न आम्ही करत होतो. त्यावेळी शरद पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रा. रामकृष्ण मोरे यांचाही सांस्कृतिक जडणघडणीमध्ये मोठा वाटा असल्याचे आमदार उमा खापरे यांनी नमूद केले. सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन श्रीकांत चौगुले यांनी केले. आभार किरण भोईर यांनी मानले. या वेळी ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या नाट्य प्रयोगाचे मोफत आयोजन करण्यात आले होते.