पिंपरी – दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी बहुतेक नागरिक गावी निघाले आहेत. काहीजण लक्ष्मीपूजन गावी जाऊन करतात तर काही जण लक्ष्मीपूजन करुन गावी जातात. यामुळे गेल्या काही दिवसांपासून एसटी बस, खासगी ट्रॅव्हल्स बसला प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली होती. अनेकांनी अधीच आरक्षण करून ठेवल्याने प्रवास सहज होत होता. मात्र, ज्यांनी आरक्षण केले नाही, अशींची चांगलीच धावपळ झाली. अनेकांनी मिळेल त्या वाहनाने गावी जाणे पसंत केले.
राज्य परिवहन महामंडळाने राज्यभरातील आगारांमधून खास दिवाळीसाठी जादा बसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील एकमेव असलेल्या वल्लभनगर आगारातून दिवाळीसाठी विविध मार्गांवर 77 जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी ऑनलाइन तसेच खिडकी तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे आरक्षीत केल्यानुसार वल्लभनगर येथे प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे.
पिंपरी चिंचवड नगरी ही कामगार नगरी असल्याने तसेच विद्यार्थी, कामगारांना दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे वर्षातील महत्त्वाचा असणारा दिवाळी सण गावी जाऊन साजरा करण्यासाठी अनेकजण गावी जात आहेत. पिंपरी चिंचवड शहरात नोकरी, व्यावसाय व शिक्षणासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातून अनेकजण आलेले आहेत.
मराठवाडा, विदर्भ, सोलापूर, औरंगाबाद, मुंबई, कोकण यांसह राज्यभर विविध ठिकाणी जाण्यासाठी प्रवासी गर्दी करत आहेत. सुखरूप व सुरक्षित गावी जाण्यासाठी अनेकजण एसटी बसला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे बसला मोठी गर्दी आणि पसंती मिळत आहे. तसेच 75 वर्षांवरील महिलांना मोफत प्रवास तर, ज्येष्ठ नागरिक व इतर सर्व महिलांना अर्धे तिकीट असल्याने अनेकजण एसटीने प्रवास करत आहेत.
ट्रॅव्हल्स, रेल्वेला गर्दी
अनेकजण एसटीचे आरक्षण मिळाले नसल्यास किंवा ट्रॅव्हल्सने आरामदायी प्रवासासाठी काहीजण ट्रॅव्हल्स, रेल्वे प्रवासाला पसंती देत आहेत. आधीच बुकिंग केलेले असल्याने प्रवास सुखकारक होत आहे. मात्र, वेळेवर गावी निघालेल्यांची मात्र, चांगलीच त्रेधातिरपट उडत आहे. ट्रॅव्हल्सनेचे प्रवासदर एसटी, रेल्वेपेक्षा जास्त असले तरी वेळेवर उपलब्ध होत असल्याने ट्रॅव्हल्सनेही प्रवास करणाऱ्यांची संख्याही जास्त आहे.