पिंपरी – टाळेबंदीमुळे गेल्या सहा महिन्यापासून बंद पडलेले देशभरातील उद्योगधंदे व छोटे-मोठे व्यवसाय नव्याने सुरु होतांना दिसत आहेत. यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवरील पदपथ किंवा मिळेल त्या ठिकाणी पुन्हा पथारीवाल्यांनी आपली दुकाने थाटली आहे. यामुळे पुन्हा करोनाच्या आधीसारखी गर्दी होताना दिसून येत आहे.
मार्च महिन्यात कोविड -19 विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदीची घोषणा करण्यात आली. यामुळे देशभरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व सर्व उद्योगधंदे बंद पडले होते. यामुळे करोनामुळे टाळेबंदी लावण्यात आल्याने लाखो नागरिकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. त्यामुळे अनेकांनी छोटे-छोटे व्यवसाय सुरु केले आहेत. यामुळे पथारी आणि फेरीवाल्यांमध्ये भर पडली आहे. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने राज्यातील विविध भागातून नागरिक परत शहरात येत असल्याने परत आपले व्यवसाय सुरु करत आहेत.
आता फेरीवाले व पथारीवाले पिंपरी-चिंचवड शहरातील मोक्याच्या ठिकाणी व गल्लोगल्ली दिसत आहे. करोना विषाणूची भीती हळूहळू नागरिकांच्या मनातून कमी होत असल्याने नागरिक सुद्धा घराबाहेर पडत असून टाळेबंदीच्या आधीसारखे शहरात फिरतांना दिसत आहेत.
शहरातील छोट्या छोट्या चौकातील आणि पदपथावर परत फेरीवाले आणि पथारीवाले आल्याने परत एकदा शहरात गर्दी होतांना दिसत आहे.