पिंपरी, चिंचवड, भोसरीत ‘जनादेश’ कोणाला?

13 लाख मतदार ठरविणार


41 उमेदवारांचे भवितव्य


मतदार आज देणार कौल 

पिंपरी – शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदार संघातील 1301 मतदान केंद्रांवर आज (सोमवारी) मतदान होणार आहे. तिन्ही मतदार संघात 41 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून 13 लाख 12 हजार 979 मतदार त्यापैकी तीन आमदार निवडणार आहेत. ईव्हीएमच्या माध्यमातून कोणाला “जनादेश’ मिळणार याबाबत सर्वसामान्यांची उत्सुकता ताणली गेली आहे.

शहरातील मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी एक तास आधी अभिरुप मतदान (मॉकपोल) घेण्यात येणार आहे. पिंपरी विधानसभा मतदार संघात आजी-माजी आमदारांमध्ये लढत होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे अण्णा बनसोडे आणि शिवसेना-भाजप महायुतीचे गौतम चाबुकस्वार यांच्या दुरंगी सामना आहे. याखेरीज एकूण 18 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. चिंचवड विधानसभा मतदार संघात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांना राष्ट्रवादी पुरस्कृत सर्वपक्षीय उमेदवार राहुल कलाटे यांनी तगडे आव्हान दिले आहे. भोसरी विधानसभेत पुन्हा एकदा लांडे-लांडगे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे आणि सर्वपक्षीय उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांच्यासह 12 उमेदवार रिंगणात आहेत.

भोसरीत साडेचार लाख मतदार
भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी 411 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. एक लाख 99 हजार 493 स्त्री आणि दोन लाख 41 हजार 601 पुरुष आणि इतर 53 असे चार लाख 41 हजार 125 मतदार आहेत. 494 कंट्रोल युनिट, 494 बॅलेट युनिट आणि 535 व्हीव्हीपॅट राखीव म्हणून तयार करण्यात आली आहेत. 2260 कर्मचारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहेत. भोसरीत सहा मतदारसंघ संवेदनशील जाहीर करण्यात आली आहेत. तर, निगडीतील यमुनानगरमधील अमृतानंदमयी शाळेत सखी मतदान केंद्र आहे. या मतदान केंद्रावर सर्व महिला कर्मचारी कार्यरत असणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्षासह पाच कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. तसेच, 10 टक्के राखीव कर्मचारी असणार आहेत.

चिंचवडमध्ये 53 मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग
राज्यातील सर्वांत दुसऱ्या क्रमाकांचा मोठा मतदारसंघ चिंचवड विधानसभा मतदारसंघ आहे. याठिकाणी 491 केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 12 मतदान केंद्र संवेदनशील असून 53 मतदान केंद्रामध्ये वेबकास्टिंगद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. दोन लाख 76 हजार 927 पुरुष आणि दोन लाख 41 हजार 980 महिला आणि इतर 32 असे एकूण पाच लाख 18 हजार 309 मतदार याठिकाणी आहेत. त्यामध्ये 495 दिव्यांग, 171 सैनिक मतदार आहेत. 491 ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 33 मतदान केंद्राचे स्थलांतरण करण्यात आले आहे. मतदानाकरिता 491 कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट तयार करण्यात आली आहेत. 98 कंट्रोल युनीट, बॅलेट युनिट आणि 50 व्हीव्हीपॅट राखीव म्हणून तयार करण्यात आली आहेत. पिंपळेनिलख येथील मतदान केंद्र क्रमांक 358 या सखी मतदान केंद्रावर निवडणूक कामकाजाकरिता सर्व महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

पिंपरीत दोन बॅलेट युनिट
पिंपरी विधानसभेसाठी 399 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यापैकी 19 मतदान केंद्र संवेदनशील जाहीर केली आहेत. तीन लाख 53 हजार 545 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत. एका यंत्रावर 15 उमेदवार आणि नोटाचा पर्याय देणे शक्‍य आहे. जास्त उमेदवार असल्याने प्रत्येक केंद्रावर दोन मतदान यंत्र (बॅलेट युनिट) वापरावी लागणार आहेत. एकूण 399 मतदान केंद्रांसाठी 798 बॅलेट युनिट असणार आहेत. या मतदारसंघात एक लाख 67 हजार 600 महिला तर एक लाख 85 हजार 939 पुरुष आणि सहा अन्य असे तीन लाख 53 हजार 545 मतदार आहेत.

प्रत्येक मतदान केंद्रासाठी असणाऱ्या ईव्हीएममध्ये 2 बॅलेट युनिट, 1 कंट्रोल युनिट असणार आहे. त्याशिवाय, प्रत्येक मतदान केंद्रनिहाय 1 व्हीव्हीपॅट मशीन लागणार आहे. पहिल्या बॅलेट युनिटवर 1 ते 16 उमेदवारांची नावे असतील. दुसऱ्या बॅलेट युनिटवर सतराव्या आणि अठराव्या उमेदवाराचे नाव आणि 19 क्रमांकाला नोटाचे (नकाराधिकार) बटण असणार आहे. एकूण 399 मतदान केंद्रांसाठी 798 बॅलेट युनिट असून 80 बॅलेट युनिट राखीव ठेवण्यात येणार आहेत. मतदान केंद्र क्रमांक 204 हे पिंपरीगावातील केंद्र सखी मतदान केंद्र म्हणून निवडले आहे. 53 मतदान केंद्रांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. मतदान केंद्रांसाठी एकूण 20 टक्के राखीव अशा एकूण 479 ईव्हीएम आहेत. 2 बॅलेट युनिट, 1 कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट याची जोडणी करुन या मशीन मतदानासाठी तयार करण्यात येतात. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुमारे 2200 कर्मचारी असणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्षासह पाच कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. तसेच, 10 टक्के राखीव कर्मचारी असणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.