पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड पोलिसांनी नुकतीच भोसरी मधील उजगरे आणि वाकड मधील आहिरराव टोळ्यांवर मोका अंतर्गत कारवाई केली आहे. भोसरी मधील टोळी प्रमुख पवन छगन उजगरे (रा. भोसरी), सुनील जनार्दन सकट (वय 32), दिपक रामकिसन हजारे (वय 27, दोघेही रा. लांडेवाडी, भोसरी) या टोळीवर नुकताच शस्त्राच्या धाकाने जबरी चोरी केल्याबद्दल गुन्हा दाखल आहे. या टोळीवर आत्तापर्यंत सहा गुन्हे दाखल आहेत.
वाकड मधील टोळी प्रमुख आदित्य ऊर्फ निरंजन शाम आहिरराव (वय 31, रा. तापकीरनगर, काळेवाडी), प्रतिक अशोक माने (वय 20, रा.थेरगाव), प्रेम संदीप तरडे (वय 19, रा. काळेवाडी) या टोळी विरोधात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. या टोळीवर आजवर एकूण दहा गुन्हे दाखल आहेत.
वरील दोन्ही टोळी प्रमुखांनी आपल्या साथीदारांसह अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळविण्यासाठी, गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी हिंसाचाराचा वापर करुन भोसरी, वाकड, सांगवी, चतुश्रृंगी, सोलापुर, अहमदनगर पोलीस स्टेशन हद्दीत खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दरोडा, जबरी चोरी, चोरी, दुखापत, दंगा, मारामारी, अग्निशस्त्रे जवळ बाळगणे अशा प्रकारचे गंभीरे स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी दोन्ही टोळ्यांवर मोका अंतर्गत कारवाईचे आदेश दिले आहेत.