पुणे – जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघात सोमवारी (दि. 21) सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत लोकशाहीचा उत्सव म्हणजेच मतदान पारपडणार आहे. जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर-हवेली, भोर, खेड-आळंदी, जुन्नर, शिरूर-हवेली, आंबेगाव-शिरूर, मावळ या दहाही मतदारसंघातील 97 मतदारांचे भवितव्य मशीनमध्ये बंद होणार असून सोमवारी पावसाचा अंदाज वतवण्यात आल्याने मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होणार असल्याची चर्चा आहे. तर पावसाच्या भीतीने उमेदवारांच्या पोटात गोळा आला आहे. दरम्यान, प्रशासन सज्ज झाले असून रविवारी (दि. 20) मतदानासाठी लागणारे साहित्य, कर्मचारी असा लवाजमा नियोजितस्थळी डेरेदाखल झाला आहे.
मतदानासाठी ग्राह्य धरले जाणारे पुरावे –
पासपोर्ट, वाहनचालक परवाना, केंद्र/राज्य सरकार/सार्वजनिक उपक्रम/पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले फोटोसह सेवा ओळखपत्र, बॅंक/पोस्ट ऑफिसद्वारे जारी केलेले फोटोसह पासबुक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अंतर्गत देशाचे महानिबंधक (आरजीआय) यांच्या वतीने जारी केलेले स्मार्ट कार्ड, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) जॉब कार्ड, श्रम मंत्रालयाच्या योजनेतंर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, खासदारांनी, आमदारांनी जारी केलेले अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड.
मतदानासाठी मदतक्रमांक –
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी (सोमवारी) मतदारांना काही अडचणी आल्यास मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मतदार मदतकेंद्र स्थापन केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात हे केंद्र सुरू आहे. सोमवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत मतदान करण्याचे आवाहन या केंद्रावरून नागरिकांना केले जाणार आहे. या मदतकेंद्रावर संपर्क करण्यासाठी दूरध्वनी क्रमांक जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करून दिले असून या क्रमांकावर संपर्क साधून मतदार आपल्या समस्यांचे निराकरण करू शकणार आहेत.
दूरध्वनी क्रमांक :
020-26121231, 26121259, 26121263, 26121264, 26121267, 26121268, 26121269, 26121271, 26121272, 26121273, 26121274, 26121275, 26121279, 26121281, 26121291.
फोटो वोटर स्लिपला सोडचिठ्ठी –
केंद्रीय निवडणूक आयोगाने यापूर्वी छायाचित्रासह मतदार चिठ्ठी (फोटो वोटर स्लिप) मतदाराचे ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यास परवानगी दिली होती. मतदार ओळखपत्राचे वाटप पुरेशा प्रमाणात न झाल्याने ही स्लीप वापरण्यात येत होती. संबंधित स्लिपमध्ये कोणतेही सुरक्षा प्रमाण नव्हते. सद्य:स्थितीत मतदारांना मोठ्या प्रमाणावर छायाचित्रासह मतदार ओळखपत्राचे वाटप झालेले आहे. तसेच, आधार कार्ड देखील आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने फोटो वोटर स्लिप ही मतदाराचे ओळख कागदपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणार नाही, असा निर्णय घेतलेला आहे. त्यासोबत ओळख पटविण्यासाठी मतदाराला छायाचित्रासह मतदार ओळखपत्र किंवा निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या 11 अतिरिक्त ओळख कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सादर करावे लागणार आहे.
जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघातील 97 उमेदवारांचे भवितव्य होणार मशीन बंद
- मतदारसंघ एकूण मतदार (मतदान केंद्र)
- जुन्नर – 2,99,648, (356 )
- आंबेगाव – 2,82,832, (336)
- खेड-आळंदी – 3,27,262,(379)
- शिरूर – 3,83,886,(389 )
- दौंड – 3,09,168, (306)
- इंदापूर – 3,05,579, (329)
- बारामती – 3,41,657, (368)
- पुरंदर – 3,61,480, (380)
- भोर – 3,61,415, (529)
- मावळ – 3,48,46, (2370)
“आंधी हो या तुफान, हम जरूर करेंगे मतदान’. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने पाऊस असला, तरी पुणे जिल्ह्यातील मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे. पुणे जिल्हा राज्यात सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी मतदान करून जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवावी.
– नवल किशोर राम, जिल्हाधिकारी पुणे
जिल्ह्यात 252 मतदान केंद्र संवेदनशील –
जिल्ह्यात एकूण 252 मतदान केंद्र संवेदनशील असून याठिकाणी 415 सूक्ष्म निरीक्षक नेमण्यात आले आहेत. याठिकाणच्या मतदान केद्रांवर वेबकास्टिंग केले जाणार असून यावर लक्ष ठेवले जाणार आहे. याठिकाणी जादा पोलीस बंदोबस्त असणार आहे. हे सूक्ष्म निरिक्षक मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल निवडणूक निरीक्षकांना पाठविणार आहे.
ऑनलाइन सुविधा –
मतदार यादीत नाव आहे का हे तपासण्याची सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्होटर हेल्पलाईन या ऍपद्वारे मतदार यादीमध्ये नाव व मतदान केंद्र शोधता येणार आहे. त्याचबरोबर ुुु.लशे.ारहरीरीहीींर.र्सीें.ळप या संकेतस्थळावरही नाव शोधता येणार आहे. मतदारांना कोणतीही माहिती हवी असल्या 1950 हा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.