पिंपरी (प्रतिनिधी) – करोना काळापासून दुरुस्ती कामासाठी बंद ठेवण्यात आलेला भोसरी, इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातील सिंथेटिक ट्रॅक दुरुस्तीकाम पूर्ण झाल्यानंतर आठ दिवसांपूर्वी खुला करण्यात आला. मात्र, ट्रॅकचा काहीसा भाग उखडल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुन्हा हा ट्रॅक दुरुस्ती कामासाठी बंद ठेवला आहे.
दुरुस्तीवर तब्बल चार कोटी खर्च करुनही ट्रॅक उखडल्याने स्थापत्य विभागाच्या दर्जाहीन कामाबाबत शंका निर्माण झाली आहे. या प्रकल्पावर खर्च केलेले चार कोटी कुणाच्या घशात घातले असा प्रश्न खेळाडुंनी उपस्थित केला आहे.
भोसरीतील इंद्रायणीनगरमध्ये पूर्वी विकसित करण्यात आलेला सिंथेटिक ट्रॅक नादुरुस्त झाला होता. त्याची नव्याने दुरुस्ती करण्याचे काम पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाने हाती घेतले होते. करोनाकाळापासून (२०२०) हे काम करण्यात येत होते. परंतु, गेल्या वर्षभरापासून दुरुस्तीचे काम कासवगतीने सुरु होते.
अतिशय संथ गतीने सुरू झालेले काम यावर्षी मार्च महिन्यात संपवून हा ट्रॅक १५ मार्च २०२४ रोजी खेळांडूसाठी खुला करण्यात आला. ट्रॅकवर खेळाडू सराव करत असताना अवघ्या काही दिवसांत हा ट्रॅक उखडण्यास सुरूवात झाली आहे. साधे बूट घालून ट्रॅकवर सराव करताना देखील हा ट्रॅक उखडला आहे.
धावण्याच्या शर्यतीतील स्पाइक बूटाला तळाकडच्या बाजूला खिळे असतात. अशा प्रकारचा बूट घालून या ट्रॅकवर सराव केल्यास हा ट्रॅक टिकणारच नसल्याचे काही खेळाडूंचे मत आहे. त्यामुळे, या ट्रॅकच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातील लॉन्स, टेनिस कोर्टच्या नूतनीकरणासह ट्रॅक उभारण्यावर महापालिकेने तब्बल चार कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, ट्रॅक सुरू झाल्यानंतर अवघ्या पाचच दिवसांनी हा ट्रॅक उखडल्याने महापालिकेने खर्च केलेले चार कोटी पाण्यात गेले का ?, असा प्रश्न खेळाडुंनी उपस्थित केला आहे.
आता सिंथेटिक ट्रॅक उखडल्याने स्थापत्यविषयक दुरुस्ती कामासाठी संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल मंगळवार (दि. २६) पासून बंद ठेवण्यात आले आहे. मागील दोन ते तीन वर्ष हे मैदान सरावास बंद ठेवल्याने १५० राज्य खेळाडू आणि ५० राष्ट्रीय खेळाडूंना सराव करता आला नाही. आता दुरुस्तीसाठी आणखी किती दिवस हे संकूल बंद ठेवण्यात येणार, असा प्रश्न खेळाडुंनी विचारला आहे.
ट्रॅकचा काही भाग उखडला आहे. तो दुरुस्त करण्यासाठी सिंथेटिक ट्रॅक बंद ठेवण्यात येत आहे. दुरुस्ती करण्यास विलंब केला तर ट्रॅकचा मोठा भाग उखडण्याची शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवसांत दुरुस्ती काम पूर्ण केल्यानंतर ट्रॅक पुन्हा सुरु केला जाणार आहे.- मनोज सेठिया, सह शहर अभियंता, स्थापत्य प्रकल्प