पिंपरी – आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पिंपरी-चिंचवडमधील देशी गोवंश व अश्व पशू प्रदर्शनामध्ये तब्बल सात कोटी रुपयांचा जातिवंत अश्व दाखल झाला आहे. हा अश्व पहायला पशू प्रेमींची झुंबड उडाली आहे. यासह विविध पशुंना पाहण्यासाठी देखील नागरिकांचा कल दिसत आहे.
या प्रदर्शनात मूळचा राजस्थानी असलेल्या या घोड्याचं नाव आहे फ्रेंजेड. हा मारवाडी प्रकारचा घोडा आहे. घोडा मालक युवराज जडेजाने सांगितले की, हा घोडा 15 लीटर दूध पितो. दररोज 5 किलो हरभरा आणि 5 किलो डाळी खातो. ‘मिनरल वॉटर’चे पाणी पितो. फ्रेजेंड हाइब्रिड असल्याचे घोडा मालकांनी सांगितले. फ्रेजेंडचे वडील राजस्थानी, तर आई रत्नागिरी प्रजातीची आहे. तो चार वर्षांचा असून गेल्या दीड वर्षांपासून युवराजसोबत आहे. फ्रेजेंडने आतापर्यंत गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. तसेच तब्ब्ल 1100 हुन स्पर्धांमध्ये तो ’विजेता’ ठरला आहे. आजपर्यंत एकाही घोड्याने त्याचा पराभव केलेला नाही.
युवराज हे व्यवसायाने जमीनदार आणि आडतदार आहेत. ते गुजरातचे रहिवासी आहेत. फ्रेंजेडच्या देखभालीवर दरमहा अडीच ते तीन लाख रुपये खर्च होत असल्याचे त्यांनी सांगितले. घोड्याची काळजी घेण्यासाठी चारजण नेहमी सोबत राहतात. घोड्यांना एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी नेण्यासाठी खास रुग्णवाहिकेसारखी गाडी असते. घोड्याच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 24 तास एक डॉक्टरही तैनात असतो, अशी माहिती आयोजकांनी दिली.
अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या पुढाकाराने मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र येथे 25 आणि 26 नोव्हेंबर असे दोन दिवस हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.