पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागात 293 घंटागाडी ठेकेदार आहेत. या ठेकेदारांना पालिकेच्या वतीने दरवर्षी दिवाळीसाठी विशेष बाब म्हणून बक्षीस देण्यात येत आहे. मात्र, काही वर्षांपूर्वी परतफेडीच्या वायद्यावर देण्यात येणारी रक्कम आता बक्षीस म्हणून देण्यात येत आहे. त्यामुळे पालिका आता 293 ठेकेदारांना 8 कोटी 7 लाख 90 हजार रूपये वाटणार आहे. या खर्चाला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सोमवारी (दि.30) स्थायी समितीची मान्यता दिली आहे.
आयुक्त सिंह हे आज (मंगळवार)पासून दि. 6 नोव्हेंबरपर्यंत जर्मनी दौऱ्यावर कार्यशाळेसाठी जाणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी सोमवारी महापालिकेत स्थायी समिती आणि सर्वसाधारण समितीची बैठक घेतली. या बैठकीत शहरातील विविध विकास कामांना मंजुरी दिली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील कचरा गोळा करण्यासाठी 1997 मध्ये घंटागाडी ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. घंटागाडीमार्फत शहरातील घरोघरचा कचरा गोळा केला जातो. मात्र, यासाठी ठेकेदारांना महापालिका दरमहिना लाखो रूपये मोजत आहे. असे असताना 2016 पासून या घंटागाडी ठेकेदारांना आरोग्य विभागाच्या वतीने दिवाळीसाठी विशेष बाब म्हणून पैसे दिले जात आहेत. दोन वर्षांपूर्वी 25 हजार तर गेल्या वर्षांपासून 293 ठेकेदारांना प्रत्येकी 30 हजार रूपये देण्यात येत आहे. यापूर्वी ही रक्कम परतफेडीच्या आधारावर देण्यात येत होती. मात्र, काही वर्षांपासून खैरात वाटल्यासारखे हे पैसे दिले जात आहेत. त्यामुळे पालिका तिजोरीवर तब्बल 8 कोटी 7 लाख 90 हजार रूपयांचा खड्डा पडणार आहे.
शहरातील घंटागाडी ठेकेदारांना दिवाळीनिमित्त विशेष बाब म्हणून काही रक्कम देण्याची तरतूद आहे. त्यानुसार 293 ठेकेदारांना प्रत्येकी 30 हजार रूपये देण्यास आयुक्तांनी मान्यता दिली आहे.
– यशवंत डांगे, सहाय्यक आयुक्त, आरोग्य विभाग
स्थायी समितीमध्ये विविध विषयांना मान्यता
महापालिकेच्या पशूवैद्यकीय विभागास नवीन दवाखान्यासाठी आवश्यक डिजिटल एक्स रे मशीन खरेदी, चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह इमारती मधील कॉरिडॉर अंतर्गत व बाह्य परिसराची दैनंदिन साफसफाई व स्वच्छता, थेरगाव येथील नाल्यांना बेडींग करणे, भिंतींची दुरुस्ती करणे, मनपाचे रस्ते आणि उद्याने सुशोभिकरणासाठी शोभिवंत रोपे पुरविणे, उद्यानांमध्ये लागवडीसाठी शोभिवंत रोपे पुरविण्याबाबतसह आदी विषयांना आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.